। खांदेश्वर । प्रतिनिधी ।
दीपावलीच्या पूर्वसंध्येला कळंबोलीकरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खास मराठमोळ्या गीतांच्या ‘गीत दीपावली पहाट’ या सांगीतिक कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुरेल गाणी, मराठी संस्कृतीचा साज आणि कलाकारांच्या बहारदार सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण संगीतमय झाले होते.
या कार्यक्रमात सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर, पुष्कर श्रोत्री, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या नामवंत कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांची मने जिंकली. मराठी भावगीते, भक्तिगीते आणि लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
दिवाळीच्या आनंदात संगीताची भर घालणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिक, महिला वर्ग आणि संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कलाकारांच्या प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट होत होता. दिवाळीच्या धावपळीतून काही क्षण विरंगुळा मिळावा आणि मराठी संगीताचा आनंद घेता यावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने कळंबोलीकरांची दिवाळी अधिक सुरेल केली. मराठमोळ्या गीतांचा ठेवा अनुभवताना उपस्थित रसिक भारावून गेले. दिवाळीचा आनंद आणि संगीताची मेजवानी यांचा सुंदर संगम या निमित्ताने अनुभवायला मिळाला.






