| पनवेल | प्रतिनिधी |
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, गरीब कुटुंबांना रेशनव्यवस्थेतून दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाने केली आहे. पात्र केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य द्यावे, विनाचौकशी बंद केलेली पात्र रेशनकार्ड पूर्ववत सुरू करावीत, तसेच तांदूळ, गहू, साखर, खाद्यतेल आणि डाळ या पाच जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात पनवेलचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. रेशनकार्ड बंद करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्यांची योग्य पडताळणी करून त्यांना बाजू मांडण्याची संधी द्यावी. तांत्रिक कारणांमुळे बंद झालेल्या पात्र रेशनकार्डांची पुनर्तपासणी करून ती तातडीने सुरू करावीत, अशी मागणीही करण्यात आली. केवळ तांदूळ आणि गहू नव्हे, तर साखर, खाद्यतेल आणि डाळींच्या वाढत्या किमतींचाही सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे रास्त भाव धान्य दुकानांमार्फत या पाच वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना लागू करावी. तसेच दुकानांमध्ये नियमित धान्यसाठा उपलब्ध ठेवावा, असा आग्रह निवेदनातून धरण्यात आला आहे.
याप्रसंगी दीपक निकम, रामदास पाटील, भरत पाटील, नितीन गावंड, ज्ञानेश्वर बडे, बबन फडके, शांताराम कुंभारकर, दत्ता फडके, शशिकांत भगत, जयंत पाखरे, संदीप घोगरे, आत्माराम लहाने यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.







