वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुखांचे आवाहन
| पनवेल | प्रतिनिधी |
दिवाळीचा सण साजरा करताना नागरिकांनी स्वतःच्या आणि घराच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी केले आहे. दिवाळीनिमित्त अनेक नागरिक बाहेरगावी जात असल्याने बंद घरांवर चोरट्यांची नजर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरफोडी, चोरी तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने महिलांनी दागिने, मोबाईल आणि पाकिटांची काळजी घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी महागडे दागिने घालणे टाळावे. बाहेरगावी जाताना घराचे दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद कराव्यात. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. घर किती दिवस बंद राहणार आहे, याची माहिती समाजमाध्यमांवर टाकू नये. तसेच शेजारी किंवा नातेवाइकांना घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी. दिवाळीनिमित्त ऑनलाइन खरेदीच्या आकर्षक जाहिराती आणि सवलतींच्या माध्यमातून सायबर भामटे फसवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच, ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी केले आहे.






