कमी पावसामुळे पीक धोक्यात
| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात सर्वत्र खरिपाच्या भात कापणीसह बांधणी, मळणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, यंदा परतीचा पाऊस वेळेआधीच गायब झाल्याने आणि कडक ऊन पडू लागल्याने भाताचे पीक अक्षरशः धोक्यात आले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने आता बळीराजाचे संपूर्ण लक्ष उरल्यासुरल्या धानाच्या पिकाकडे आणि सरकारच्या धान हमी भावाकडे लागले आहेत.
खरीप हंगामातील सुरवातीच्या धान पेरणीला पाऊस लांबला. त्यानंतर जोरदार बरसला आणि पूरपरिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे पेरणी केलेले धान वाहून गेले. त्याचे केलेले पंचनामे शासन दरबारी पटलावर असताना देखील त्यात पुन्हा दुबार पेरणी करत भाताची लागवड केली. दरम्यानच्या काळात मात्र पाऊस समाधानकारक झाल्याने हिरवीगार भातशेती डोळाने डोलू लागली. कणसे धरली मात्र, गणपतीनंतर पासाने ऐन पिकांच्या गरजेच्या वेळी दगा दिला. पाऊस अचानक कमी झाल्याने आणि उष्णता वाढल्याने भाताची लोंबी सुकून गेल्या. दाणे भरण्यापूर्वीच पीक करपण्याच्या मार्गावर गेल्याने बळीराजावर धानाचा तोटा निर्माण झाला. त्यामुळे बळीराजाच्या डोक्यावर खर्चाचा डोंगर, त्यात उत्पन्नाची खात्री नसल्याने त्याची यंदाची दिवाळी ही दुष्काळी दिवाळी असल्याने तो मोठ्या चिंतेत पडला आहे. शेतीसाठीची मशागत, बी बियाणे, खते आणि आता कापणीसाठी लागणारा मजुरीचा किंवा अत्याधुनिक यंत्राचा खर्च हा गगनाला भिडला आहे. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्याला धान पिकाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा बळीराजा मोठा अधिक चिंतेत सापडला असल्याने याबाबत सरकार काही मार्ग काढणार का? याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.
बळीराजाची यंदाची दिवाळी ही दुष्काळी दिवाळी असल्याचे धान पिकांवरुन दिसून येत आहे. पावसाने घात केल्याने पीक हातचं जाण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपली आहे. रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून जे काही हातात पडेल, त्याला तरी सरकारने योग्य आणि चांगला हमीभाव दिला पाहिजे. राज्य सरकारच्या दुष्काळी यादीतून रोहा तालुका वगळल्यामुळे सरकारला आतातरी जाग येईल का? रोहा तालुक्यातील शेतकऱ्याला मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता सरकारी मदतीची आणि हक्काच्या हमी भावाची आस आहे.
– डॉ. मंगेश सानप






