| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील वाशी नाक्यापासून वाशी गावापर्यंत नवीन विद्युत खांब उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामात सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जा राखला जात असल्याचा आरोप होत असून, अंदाजपत्रकातील निकषांना हरताळ फासून ठेकेदाराकडून थातूरमातूर काम केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
विद्युत खांब उभारण्यासाठी नियमानुसार साडेतीन फुटांपर्यंत खोल खड्डे खोदणे आवश्यक असताना प्रत्यक्षात जेमतेम दोन ते सव्वादोन फुटांचेच खड्डे खोदले जात आहेत. तसेच, खड्डे भरण्यासाठी योग्य दर्जाचे दगड वापरण्याऐवजी मुरमयुक्त लाल रंगाचे दगड वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय केवळ दोन घमेले ग्रिट टाकून वरच्या बाजूने सिमेंटचा मुलामा दिला जात असून, खड्ड्याच्या आतील बाजूस पुरेशा प्रमाणात सिमेंटचा वापर केला जात नसल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, वाशी शाखा अभियंता संदीप गायकवाड यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने लाईनमन रोहिदास बिंदुकले यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनीही प्रत्यक्ष कामाची पाहणी करून काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच, खड्डे आणखी खोल खोदण्याची आवश्यकता असल्याचे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे बजावले. मात्र, या सूचनांकडेही दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे काम सुरूच असल्याचे दिसून आले. विद्युत खांब उभारणीसारख्या महत्त्वाच्या कामातच अशा प्रकारे हलगर्जीपणा होत असेल, तर भविष्यात खांबांच्या मजबुतीचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का? तसेच अंदाजपत्रकानुसार काम करून घेणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






