सहा वाहनांची एकमेकांना धडक
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात शुक्रवारी (दि.13) पहाटे पाठोपाठ दोन अपघात घडले. यामध्ये एकूण सहा वाहनांची एकमेकांना धडक बसली. अपघातानंतर एका वाहनाच्या बॉनेटमधून धूर बाहेर पडू लागल्याने बोगद्यात आग लागण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच अग्निरोधक यंत्राचा वापर केल्याने संभाव्य दुर्घटना टळली. सुदैवाने दोन्ही अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सहाही वाहनांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिला अपघात शुक्रवारी पहाटे 2 वाजून 33 मिनिटांनी झाला. कोस्टल रोड नियंत्रण कक्षाकडून या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस, रुग्णवाहिका आणि टोइंग व्हॅन तात्काळ घटनास्थळी दाखल दाखल झाल्या. बचावकार्य सुरु असतानाच सुमारे 15 मिनिटांनी त्याच ठिकाणी दुसरा अपघात झाला. यावेळी, एक कार आणि टॅक्सीची टक्कर झाली. या अपघातानंतर लगेचच एका कारमधून धूर निघू लागला. त्यामुळे बोगद्यामध्ये आग पसरण्याची शक्यता होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच अग्निरोधक यंत्राचा वापर केल्याने संभाव्य दुर्घटना टळली. या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सहाही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीवरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.






