| खोपोली | प्रतिनिधी |
सुरतवरून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या बसचा ब्रेक निकामी होऊन अनेक वाहनांना धडक देऊन भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी (दि.12) खोपोलीतील शिळफाटा येथे घडली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतवरून निघालेली बस महिला प्रवाशांना घेऊन खोपोलीतील अष्टविनाय देवस्थानापैकी असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली. त्यानंतर पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी निघाली. परंतु, या बसचालकाला रस्ता माहित नसल्यामुळे त्याने खोपोली येथील शिळफाटामार्गे बस नेली. आणि त्याचवेळी बसचा ब्रेक निकामी झाला आणि बस विरूद्ध दिशेला गेल्याने समोरून येणाऱ्या सात ते आठ वाहनांना धडक दिली. या धडकेत बससह अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, बसमधील महिला प्रवासी आणि धडक बसलेल्या वाहनांतील प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच, यादरम्यान सुरतवरून निघालेल्या बसचालकाने मुंबईच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केल्याचे देखील प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे






