। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील पुई स्टॉपजवळ बसविण्यात आलेले गतिरोधक हे अपघाताचे कारण ठरत आहेत. या गतिरोधकामुळे दिवाळीच्या सात दिवसात तीन-चार अपघात झाले आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु येथील अपघात टाळण्यासाठी येथे रस्त्याला सिग्नल लावण्यात यावे. याशिवाय गतिरोधकाला पांढरे पट्टे मारणे गरजेचे आहे. अन्यथा यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील पुई स्टॉपजवळ अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बांधण्यात आले. परंतु,बांधण्यात आलेल्या गतिरोधकांची उंची योग्य असणे आवश्यक होती. तसेच गतिरोधक गोलाकार असावे, त्याची रुंदी 3.6 व त्याची उंची 6 ते 8 इंच पेक्षा नसावी. जेणेकरून वाहने आपटणार याची दक्षता घेणे गरजेचे होते. तसेच हे गतिरोधक लांबून दिसण्यासाठी 40 मीटर अंतरावर सूचना फलक लावणे आवश्यक होते. परंतु पुई स्टॉप जवळील गतिरोधकाची उंची जास्त असल्यामुळे वाहने गतिरोधकावरून जाताना आदळत आहेत. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील पुई स्टॉपजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक होते. या गतिरोधकामुळे अपघातात दोन ते तीन जणांचे बळी गेले. यामुळे एका बाजूचे गतिरोधक काढून टाकण्यात आले. परंतु कोलाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी वाहने पुई येथील महिसदरा पुलावरून पुई स्टॉपकडे जाताना स्टॉपजवळ उतार असल्यामुळे व गतिरोधकाला पांढरे पट्टे नसल्याने येथील गतिरोधक दिसत नाही. यामुळे वाहन चालकांना वाहनांवर नियंत्रण मिळवणे कठीण जात असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गतिरोधकाला पांढरे पट्टे मारण्यात यावे. तसेच इतर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.






