लाखो लिटर पाणी वाया
। कर्जत । प्रतिनिधी ।
किकवी-चिल्हार नदीवरील केटी बंधाऱ्याला मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वीच बंधाऱ्याच्या गेटवर पिवळ्या रंगाच्या लोखंडी प्लेट्स बसवण्यात आल्या होत्या. मात्र, त्या प्लेट्सच्या सर्वच गेटमधून पाण्याचे फवारे उडत असून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. हा प्रकार काही दिवसापासून सुरु असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
बंधाऱ्याच्या पाचही गेटमधून पाणी जोरात वाहत आहे. त्यामुळे बंधाऱ्यात साठलेले पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे. या बंधाऱ्यावर किकवी, चिल्हारसह आजूबाजूच्या गावातील शेतकरी तसेच नळपाणी योजना अवलंबून असून, रब्बी हंगाम, भाजीपाला, जनावरांसाठी पिण्याचे पाणी, नळपाणी यासाठी याच बंधाऱ्याचा आधार आहे. गळती थांबली नाही तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचीही मोठी टंचाई निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी तसेच लोभेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
लोखंडी प्लेट्स बसवूनही गळती थांबली नाही, यामुळे कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरी पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन बंधाऱ्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह लोभेवाडी ग्रामस्थांकडून केली जात आहे.






