| मुंबई | प्रतिनिधी |
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. अजित पवार होते तोपर्यंतच विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर हा विषय माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी संपला आहे, असे स्पष्ट करत सुळेंनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएसोबत सत्तेत जाणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलिनीकरणावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चांना उधाण आले होते. बैठका, भेटी आणि नेत्यांच्या विधानांमुळे विलिनीकरणाच्या शक्यतेला बळ मिळत होते. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
माझा भाऊ होता तोपर्यंत विलिनीकरणाची चर्चा होती. त्यासाठी तारीखही ठरली होती. मात्र, ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्या मनात आणि माझ्या पक्षात या विषयाला पूर्णविराम मिळाला, असे त्या म्हणाल्या. अजित पवार यांच्यासोबत जे ठरले होते, ते त्यांच्यापुरतेच होते. त्यानंतर आमच्या पक्षाकडून विलिनीकरणाबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीएसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.






