कवितेतून सरकारवर घणाघाती प्रहार; साय डोंगरात टोरंटविरोधात एल्गार
| पाली | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोडीविरोधात आता साहित्यिक आणि कवीही आक्रमक झाले आहेत. कवितेच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांवर आसूड ओढत विद्रोही कवींनी पाली येथे सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. ‘अरं सरकारा, दुष्ट सरकारा, तू भस्मासुर हाय!’ या पहिल्याच आगरी कवितेने कविसंमेलनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण संमेलन सरकारविरोधी कवितांनी चांगलेच तापले.
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) रायगड यांच्या वतीने साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या जाहीर विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साय डोंगरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल टोरेंट कंपनी अर्थात सरकारच्या माध्यमातूनच झाल्याचा आरोप परिसरात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
जनार्दन सटाण्ो यांच्या जोशपूर्ण सूत्रसंचालनाने संमेलनातील विद्रोहाची धार अधिक तीव्र केली. कॉम्रेड गोपाळ शेळके यांनी आपल्या कवितेतून सरकारच्या कथित पापी कृत्यांचा जहरी शब्दांत समाचार घेतला. कवयित्री अक्षता गोसावी, नरेश पाटील, वसंत मोहिते, रामदास गायधने, भारती ढकवळ, ॲड. संतोष जोहेकर, ॲड. कल्पना वाळिंजे, जनार्दन सटाण्ो, अनंत भोईर, दामोदर गायकवाड, शाहीर अनंत पाटील, महेश बार्शी, मारुती बागडे गुरुजी आणि सुरेश पडघेकर यांनी आपल्या कवितांतून वृक्षतोड, पर्यावरणाची हानी आणि सरकारच्या भूमिकेवर परखड भाष्य केले.
या संमेलनाला कॉम्रेड प्रकाश रेड्डी, महाराष्ट्राचे ज्येष्ठ गझलकार अप्पा ठाकूर, प्राचार्य अजित मगदूम, सुभाष लानदे साहेब, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मुंबईकर, ॲड. सतीश शेळके, समाजसेविका वृषाली मगदूम आणि साहित्यिक मुनघाटे वाशी यांनी उपस्थित राहून संमेलनाला बळ दिले. दरम्यान, अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत जोरदार घोषणाबाजी केली. कविसंमेलनानंतर सर्व कवी आणि कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी घोषणा देत साय डोंगरातील वृक्षतोड झालेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कवितेच्या माध्यमातून सुरू झालेला हा आवाज आता प्रत्यक्ष आंदोलनाच्या मैदानातही पोहोचल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड गोपाळ शेळके यांनी केले, तर आभार ॲड. संतोष जोहेकर यांनी मानले.






