महिला, ज्येष्ठ नागरिकाचे प्रचंड हाल; फलाट शोधताना अडचणींचा सामना
| पनवेल | प्रतिनिधी |
कोकण आणि मुंबईला जोडणारे महत्त्वाचे केंद्र असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. कोकण रेल्वेतून पनवेल येथे उतरल्यानंतर मुंबईकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना तिकीट काढण्याकरिता सुमारे 300 मीटर अंतर चालावे लागते. त्यातच फलाटांवरील दिशादर्शक फलकांचा अभाव, भुयारी मार्गातील गैरसोय आणि स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला बस व रिक्षांची अपुरी व्यवस्था यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सामानासह प्रवास करणाऱ्या पर्यटकांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या स्थानकातील असुविधांकडे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष कधी जाणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
रेल्वे स्थानक हे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. कोकण रेल्वेच्या पाच, सहा आणि सात क्रमांकाच्या फलाटांवर गाड्यांमधून उतरल्यानंतर मुंबईकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी एक, दोन आणि तीन क्रमांकाच्या फलाटांवर जावे लागते. मात्र, लोकलचे तिकीट काढण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळील तिकीट खिडकीपर्यंत जावे लागत असल्याने प्रवाशांना अतिरिक्त पायपीट करावी लागते. संबंधित भुयारी मार्गात तिकीट खिडकी किंवा स्वयंचलित तिकीट यंत्र बसविल्यास प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचू शकतात.
स्थानकातील फलाटांदरम्यान जाण्यासाठी भुयारी मार्गाची सुविधा असली, तरी दिशादर्शक फलक आणि माहितीफलक पुरेशा प्रमाणात नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. विशेषतः प्रथमच पनवेल स्थानकावर येणाऱ्या पर्यटकांना योग्य फलाट शोधताना अडचणी येतात. पाच, सहा आणि सात क्रमांकाच्या फलाटांवरून हार्बर मार्गावरील फलाटांवर जाण्यासाठी भुयारी मार्ग अधिक सुलभ आणि स्पष्ट दिशादर्शक व्यवस्थेसह विकसित करण्याची गरज आहे.
स्थानकाच्या बसस्थानकाकडील बाजूला रिक्षा आणि बसची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने लांब अंतर चालत जावे लागते. सामानाच्या बॅगा घेऊन प्रवास करणाऱ्या कोकणातील प्रवाशांना याचा विशेष त्रास सहन करावा लागतो. स्थानकाच्या दोन्ही बाजूंना रिक्षा आणि बसची सुविधा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांची गैरसोय कमी होऊ शकते. कोकणातील रेल्वे स्थानकांवरील सुविधांसाठी पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पनवेल स्थानकातील समस्यांकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
दिशादर्शक फलकांची आवश्यकता
फलाटांवरील दिशादर्शक फलक, भुयारी मार्गातील सुलभ व्यवस्था, तिकीट खिडकी किंवा स्वयंचलित तिकीट यंत्रे तसेच दोन्ही बाजूंना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.






