धुराचे, आगीच्या ज्वाळांचे मोठे लोट
। उरण । प्रतिनिधी ।
वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लाँजिस्टीक या मालाची साठवणूक करणाऱ्या गोदामाला भीषण आग लागण्याची घटना सोमवारी (दि.16) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदर गोदामात केमिकलचा साठा असल्याने स्फोटामुळे परिसर हादरून गेला होता. गोदामात होणारे स्फोट आणि धुराचे लोट हवेत उडताना दिसत असल्याने रहिवाशांची एकच धावपळ उडाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट समजू शकले नाही. सदर आगीची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले आहेत.
उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत शासनाच्या नियमांची पायमल्ली करून अनेक कंटेनर यार्ड, गोदामे उभी राहिली आहेत. या गोदामात फायर ऑडिट वारंवार प्रशासनाकडून होत नसल्याने तालुक्यातील अनेक गोदामात आगीच्या घटना घडत आहेत. त्यात सोमवारी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लाँजिस्टीक या मालाची साठवणूक करणाऱ्या गोदामाला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या गोदामात केमिकलचा साठा असल्याने वारंवार स्फोट होत असल्याने आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट हवेत उडताना दिसत होते. सदर आगीची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्याने सिडको, पनवेल महापालिका, नवीमुंबई महापालिका येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू केले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर हे घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. केमिकलच्या स्फोटक पदार्थांमुळे रहिवाशांना श्वासांचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.






