निर्णायक लढाई कायम राहण्याचा विश्वास
| नेरळ | प्रतिनिधी |
पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या खातेदारांचा संवाद मेळावा खोपोली येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बँकेच्या ठेवीदारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचा विश्वास ठेवीदारांना देण्यात आला. तसेच, निर्णायक यश मिळेपर्यंत आपली लढाई कायम राहील, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्यावतीने सहकार विभागाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी संवाद बैठक आयोजित केली होती. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवरांनी पुढील लढ्याची दिशा आणि ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आपली मते मांडली. दि.23 सप्टेंबर 2010 पासून सुरू असलेला हा संघर्ष आता जवळपास 16 वर्षांचा झाला आहे. या प्रदीर्घ लढ्यात अनेक चढ-उतार आणि संघर्षांचा सामना करावा लागला. रस्त्यावरची आंदोलने, खोपोली ते मंत्रालय असा मोर्चा, न्यायालयीन लढाई, तसेच राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर विविध मान्यवरांच्या भेटीगाठी, बैठका आणि चर्चा अशा अनेक मार्गांनी ठेवीदारांच्या न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या सोळा वर्षांच्या संघर्षानंतरही अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र,दिवाळीच्या पूर्वसंध्येला उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ठेवीदारांना निश्चितच काहीसा दिलासा मिळाला आहे; परंतु, हा कायमस्वरूपी तोडगा नाही. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे पूर्णपणे आणि न्याय्य पद्धतीने मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. हा केवळ पैशांचा प्रश्न नाही, तर हजारो ठेवीदारांच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई आणि त्यांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री भेट घेऊन या गंभीर प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.






