| चणेरा | प्रतिनिधी |
रोह्याच्या विद्यमान नगरसेविका, स्पंदन नाट्य संस्था आणि सखी मंचाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या स्नेहा आंब्रे यांचे शनिवारी (दि.14) निधन झाले. स्नेहा आंब्रे पूर्वाश्रमिच्या मनिषा देशमुख यांनी आपले वडील व्ही.टी. देशमुख यांच्याकडून राजकीय सामाजिक कार्याचे बाळकडू घेतले. त्यासोबत त्यांच्या आई सुमन देशमुख या मेहेंदळे हायस्कुलमध्ये शिक्षिका असल्यामुळे त्यांच्याकडून सांस्कृतिक क्षेत्राची आवड जोपासली. त्याचा प्रत्यय त्यांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आजवरच्या वाटचालीत वेळोवेळी जाणवून आला. त्यांचे पती शिरीष आंब्रे, त्यांचे मोठे बंधू संदीप देशमुख व छोटे बंधू न्यायाधीश सचिन देशमुख यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना सहकार्य व प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्या सर्व क्षेत्रात यशस्वी झाल्या असल्याचे त्या वारंवार अभिमानाने सांगत असत. स्नेहा आंब्रे यांच्या जाण्याने रोह्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वातील एक खंबीर, कर्तृत्ववान आणि लढवय्ये व्यक्तिमत्त्व हरपले आहे. महिलांना एकत्र आणून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि समाजासाठी त्यांनी केलेले कार्य कायम रोहेकरांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या अंत्ययात्रेला राजकीय नेते, सर्व नगरसेवक, नातेवाईक व रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






