पक्षी निरिक्षकांसह पर्यटक सुखावले; पर्यटन वाढीलाही चालना मिळणार
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. मागील काही दिवसांपासून वातावरण अनुकूल झाले असून, थंडीही चांगली पडू लागली असल्याने स्थलांतरीत व स्थानिक पक्षांची रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासक, निरीक्षक व पर्यटक सुखावले आहेत. तसेच, यामुळे पर्यटन वाढीला देखील चालना मिळत आहे.
गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने निसर्गरम्य रायगड जिल्ह्यात परदेशी आणि काही स्थानिक स्थलांतरित पक्षांची रेलचेल पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर हिट व अवकाळी पाऊस अशा हवामानातील बदलामुळे स्थलांतरित पक्षांसाठी पोषक परिस्थिती नव्हती. आता मात्र थंडीच्या आगमनास सुरुवात झाली असल्याने स्थलांतरित पक्षी दाखल होत आहेत. या पक्षांचे दर्शन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, दलदलीच्या जागा, जंगले, भातशेती, खाड्या तसेच गवताळ प्रदेशात होत आहे. हे पक्षी वाढलेल्या गवतांमधील आणि साठलेल्या जलाशयामधील कीटक, कीडे, कृमी, मृदुकाय जीव-जंतू खाण्यासाठी, तसेच समुद्रकिनारे आणि दलदलीच्या भागातील छोटे खेकडे, मृदुकाय प्राणी, मासे, जल कीटक हे खाऊन पर्यावरणाचे संरक्षण व जैवविविधता समृद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे ही पक्षी अभ्यासक, निरीक्षक तसेच पर्यटकांनाही मोठी पर्वणीच आहे.
उत्तर गोलार्धातील युरोप, रशिया आणि उत्तर अमेरिका यासारख्या देशात थंडीच्या दिवसात पडणाऱ्या बर्फामुळे जमिनीवरील भूभाग हा बर्फाने आच्छादलेला असतो. त्यामुळे पक्षांना खाद्य मिळणे कठीण होऊन जाते. म्हणून हे पक्षी विविध देशात स्थलांतर करून आपली उपजीविका भागवत असतात. तसेच, रायगड जिल्ह्यात पडणारी थंडी आणि पुरेशा प्रमाणात मिळणारे खाद्य, त्याचबरोबर योग्य अधिवास या सर्व कारणांमुळे या पक्षांना आपली घरटी बांधून पिल्लांचे संगोपन करणे सोपे जाते. म्हणून बऱ्याच स्थलांतरित पक्षांचा विणीचा काळ सुद्धा हाच असतो, असे कोलाड येथील पक्षी अभ्यासक सागर दहिंबेकर यांनी सांगितले.
परदेशी स्थलांतरित पक्षी
ब्ल्यू थ्रोट (शंकर), युरोपियन रोलर (तास पक्षी), युरेशियन रायनेक (मानमोडी), सायबेरियन स्टोनचाट (गप्पीदास पक्षी), बंटिंग्स (भारीट पक्षी), पॅलिड हॅरिअर (पांढूरका भोवत्या).
स्थानिक स्थलांतरित पक्षी
पॅराडाईज फ्लाय कॅचेर (स्वर्गीय नर्तक), इंडियन रोलर (भारतीय तास पक्षी), श्राईक (खाटीक), युरेशियन हुपू (हुदहुद), क्रेस्टेड बंटीग (युवराज).
जिल्ह्यात 400 हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी येथे अनेक प्रकारचे पोषक नैसर्गिक अधिवास आहेत. त्यामुळे चांगल्या संख्येने पक्षी दाखल होतात. समुद्रकिनारे, पाणथळीचे प्रदेश, घनदाट जंगले, माळराने अशा अधिवासांमध्ये विविध प्रकारच्या पक्षी प्रजाती जिल्ह्यात थंडीच्या मोसमात येतात. पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी ही गुलाबी थंडी पर्वणीच असते.
शंतनु कुवेसकर,
पक्षी व वन्यजीव अभ्यासक, माणगाव






