साफ सफाई करण्याची ग्रामस्थांची मागणी; पाण्याचा दैनंदिन वापरासाठी उपयोग
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे केएमजी विभागातील मराठाआळी येथे जुन्या काळापासून अस्तित्वात असलेला कौडाल तलाव गाळ, माती, झाडा झुडप्याने भरलेला आहे. जन जनावरांचे अस्तित्व असलेल्या या तळ्याचा श्वास गुदरमरलेला असून, लवकरच तलावाची साफ सफाई करावी अशी अर्त मागणी ग्रामस्थ मंडळ मराठाआळी ने नागोठणे ग्रामपंचायतीकडे केली आहे.
नागोठणे मराठाआळी येथे इतिहासाची परंपरा सांगत असलेल्या काळापासून साधारण दोन ते तीन एकरात पसरलेल्या या तलावात पूर्वेकडील डोंगरातून पावसाचे पाणी जमा होते. पावसाळ्यात तलाव पूर्ण भरल्यावर तलावाचे पाणी नाल्याद्वारे वाहत जात अंबा नदीला मिळते. पूर्वीच्या काळात माणसांसाठी, जनावरांसाठी तसेच इतर कामासाठी विहिर, तलाव हे पाण्याचे स्रोत म्हणून कार्यरत होते. कौडाल तळ्यातील पाण्याचा वापर केएमजी विभागातील ग्रामस्थ आपल्या दैनंदिन वापरासाठी करीत होते. पण अलिकडच्या काळात हा तलाव माती, शेवाळ, झाडा, झुडपाने, प्रदुषणाने व्यापलेला आहे तसेच या तळ्यात जन जनावरांचे अस्तित्व असल्याने तळ्याच्याकडेला राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ लागला आहे.
मराठाआळीतील ग्रामस्थांनी नागोठणे ग्रामपंचायतीकडे या तलावाची साफ-सफाई करण्यासाठी अर्ज केला होता. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने तलावाचे प्रदुषण रोखणे, पाणी शुध्दीकरण आणि सुशोभीकरणासाठी विशेष निधी दिला जातो. सन 2020–21 या वर्षात या तलावाच्या संपूर्ण सुशोभीकरणाचे काम चालू होते. परंतु, आजमितीस या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झालेले नसून काही प्रमाणात झालेले काम ही निकृष्ट दर्जाचे आहे असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यभर दुष्काळाची परीस्थिती ओढवलेली आहे. जनावरांना चारा, पाणी यासारख्या समस्या दुष्काळ काळात निर्माण होणार आहेत. गाळाने भरलेली तलावे शासनाने शुध्द केली तर अशा तलावांचे पाण्याचा वापर होणार आहे.
जलचरांच्या वास्तव्यात वाढ
तळ्यात माती, शेवाळ, झाडे, झुडपे वाढलेली दिसत असून त्यात जलचरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहे. त्याचा त्रास व भिती ग्रामस्थांना होताना दिसत आहे.






