कवींच्या कवितांनी सारडे गावात रंगली साहित्याची मैफल
| उरण | प्रतिनिधी |
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उरण शाखेतर्फे उरण तालुक्यातील सारडे येथे बहारदार कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध कवींच्या कविता, शाहिरी आणि आगरी बोलीतील सादरीकरणामुळे या साहित्यिक मैफलीत रंगत आली. भेंडखळ गावच्या संगीता भगत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी प्रा. एल.बी. पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, के.एस. पाटील, सुनंदा पाटील आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात गंधार पाटील यांनी केले. आजच्या समाजातील महिषासुर अधिक घातक असल्याचे सांगत त्यांनी कार्यक्रमाचे आयोजक सारडे येथील पाटील कुटुंबियांचे अभिनंदन केले. म.का. म्हात्रे यांच्या सुरेख सूत्रसंचालनाखाली कविसंमेलन रंगले. बालकवी अनुज शिवकर, अभ्यासू कवी केशव म्हात्रे, शाहीर अनंत पाटील, अजय शिवकर, मच्छिंद्र म्हात्रे, प्रा. एल. बी. पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या. विशेषतः आगरी बोलीतील कवितांनी उपस्थितांची दाद मिळवली आणि वातावरण हलके-फुलके केले. जे. एस. पाटील, एम. एस. पाटील, सुनील पाटील, हरिश्चंद्र पाटील आणि पाटील कुटुंबियांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. सुनील केशव यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी अनेक मान्यवर तसेच नागरिकांनी कवितांचा अस्वाद घेतला.






