तीन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर उभारणी; सीएसआर सहभागातून राबविणार प्रकल्प
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि अन्य कामांसाठी दररोज घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा मिळावी, यासाठी पनवेल महानगरपालिकेने आधुनिक ‘पिंक टॉयलेट्स’ उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसह आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमांतर्गत सुरुवातीला तीन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर पिंक टॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर शहरातील गर्दीच्या 25 ते 50 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या स्वच्छतागृहांमध्ये भारतीय पद्धतीची तसेच स्वयंचलित फ्लशयुक्त शौचालये, सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारी यंत्रणा आणि वापरलेल्या नॅपकिनची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटरची सुविधा असेल. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उभारण्याची संकल्पनाही या प्रकल्पात आहे. त्यामुळे लहान बाळांसह प्रवास करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन मदतीसाठी पॅनिक बटण आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच सौरऊर्जेचा वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी बोअरवेलची सुविधाही नियोजित आहे. केवळ स्वच्छतागृह न उभारता महिलांसाठी सर्वसमावेशक सुविधा केंद्र विकसित करण्याचा या प्रकल्पामागील उद्देश आहे.आता प्रस्तावाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही कधी सुरू होते, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
गर्दीच्या ठिकाणांना प्राधान्य
पहिल्या टप्प्यातील तीन ठिकाणांनंतर पनवेल, खारघर, मानसरोवर आणि खांदा कॉलनी रेल्वे स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठा, आठवडी बाजार, बसथांबे, उद्याने, जॉगिंग ट्रॅक आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात पिंक टॉयलेट्स उभारण्याचा विचार आहे. यासाठी गर्दीचे प्रमाण आणि महिलांची वर्दळ लक्षात घेऊन 25 ते 50 ठिकाणांची निवड केली जाणार आहे.







