21 जणांचे लचके तोडले
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली वसाहतीमध्ये एका भटक्या श्वानाने अक्षरशः धुमाकूळ घालत 21 नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत एकाच श्वानाने नागरिकांवर हल्ले करून त्यांचे लचके तोडले. या हल्ल्यामुळे परिसरातील रस्त्यांवर रक्ताचे सडे पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. घटनेतील जखमींवर पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, या घटनेची सोमवारी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे नोंद करण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एका भटक्या श्वानाने कळंबोली वसाहतीतील नागरिकांवर हल्ले केले. या हल्ल्यात तब्बल 21 जणांना श्वानाने चावा घेतला. एकाच श्वानाने वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांवर हल्ले केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे जखमींवर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. या घटनेची अधिकृत नोंद सोमवारी वैद्यकीय आरोग्य विभागाकडे झाल्यानंतर भटक्या श्वानांच्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये भटक्या श्वानांचे टोळके अनेक ठिकाणी फिरताना दिसते. मात्र, एकाच श्वानाने 21 नागरिकांवर हल्ला केल्याची घटना गंभीर मानली जात आहे. सकाळी शाळेत जाणारी मुले, कामावर जाणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये घराबाहेर पडतानाही भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
महापालिकेच्या उपाययोजनांकडे लक्ष
भटक्या श्वानांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण प्रभावीपणे राबविण्यासोबतच नागरिकांवर हल्ला करणाऱ्या आक्रमक श्वानांबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कळंबोलीतील या घटनेनंतर महापालिका प्रशासन याबाबत कोणती पावले उचलते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.







