खरी पत्रकारिता जपण्याचा निर्धार
| महाड | प्रतिनिधी |
महाडमधील भुरट्या पत्रकारांमुळे येथील अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अशा भुरट्या पत्रकारांच्या विरोधात पत्रकार रवी शिंदे यांच्या अधिपत्याखाली महाडचे स्थानिक पत्रकार एकवटल्याने स्थानिकांमध्ये उत्साह संचारला आहे. गेल्या काही काळापासून महाड तालुक्यात जिल्हा बाहेरील काही तथाकथित पत्रकारांचा वावर वाढला आहे. पत्रकारितेच्या नावाखाली दमदाटी करणे, अधिकाऱ्यांना घाबरवून काम करून घेणे, बातमी लावण्याची भीती दाखवून आर्थिक मागणी करणे, अशा प्रकारांमुळे येथील शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे खरी पत्रकारिता करणाऱ्या स्थानिक पत्रकारांचीही बदनामी होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाडमधील सर्व स्थानिक पत्रकारांनी आता एकजूट दाखवली आहे.
यावेळी पत्रकारांनी सांगितले की, पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा आहे. जनतेचे प्रश्न मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, हे खरे पत्रकाराचे काम आहे. मात्र, पत्रकारितेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करणे, ही पत्रकारिता नव्हे. अशा प्रवृत्तींमुळे प्रामाणिक पत्रकारांवरही लोकांचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे अशा भुरट्या प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यापुढे कोणीही पत्रकारितेच्या नावाखाली दादागिरी करत असेल, अधिकाऱ्यांना त्रास देत असेल, तर त्याची माहिती एकमेकांना देऊन त्याच्याविरुद्ध कायदेशीर आणि संघटनात्मक पद्धतीने लढा दिला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.






