| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहरातील स्वच्छता राखण्यासह नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर व शैलेश वासलेकर यांनी मुरूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन कर निर्धारण अधिकारी अनिकेत जगदाळे यांनी स्विकारले आहे.
मुरूड नगरपरिषदेकडून शहराच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असतानाही शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. मुरूड मच्छीमार्केट, भाजी मंडई तसेच शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः एकदरा पुल ते नवाबकालीन राजवाड्यापर्यंत समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या जेटी परिसरात नगरपरिषदेकडून दररोज साफसफाई केली जाते. मात्र, साफसफाई केल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, मुरूड समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांकडूनही काही प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण समुद्रकिनारी तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे मंडळाने निवेदनात म्हटले आहे.







