विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमणार परिसर; 21 नोव्हेंबरपासून 15 दिवस यात्रेची धूम
| खोपोली | प्रतिनिधी |
श्रद्धा, भक्ती आणि ग्रामीण संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या साजगावच्या प्रसिद्ध बोंबल्या विठोबाच्या यात्रेचे वेध आता पंचक्रोशीला लागले आहेत. कार्तिकी एकादशीच्या पर्वावर 21 नोव्हेंबरपासून या यात्रेला प्रारंभ होणार असून तब्बल 15 दिवस साजगाव परिसर भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात न्हाऊन निघणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणारे भाविक, पारंपरिक बैल बाजारासाठी दाखल होणारे शेतकरी आणि खरेदी-विक्रीसाठी येणारे नागरिक यामुळे यंदाही यात्रेला मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.
साजगावच्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेला अनेक वर्षांची परंपरा लाभली आहे. मुंबई-पुणे महामार्गालगत भरणाऱ्या या यात्रेचे धार्मिक महत्त्व खालापूर तालुक्यापुरते मर्यादित नसून रायगड जिल्ह्यासह मुंबई आणि पुणे परिसरातील भाविकही या यात्रेत सहभागी होतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीच्या वतीने जय्यत तयारी सुरू असून दुकाने, स्टॉल्स आणि मनोरंजनाच्या साधनांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.
यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन आणि धार्मिक कार्यक्रम. भजन, कीर्तन तसेच पालखी सोहळ्याच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भाविकांची मांदियाळी यामुळे साजगाव परिसरात भक्तीचा जागर अनुभवायला मिळणार आहे.
यात्रेला होणारी गर्दी आणि मुंबई-पुणे महामार्गाचे जवळचे स्थान लक्षात घेता वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेचे आव्हान यंत्रणांसमोर असणार आहे. यात्रेच्या 15 दिवसांच्या कालावधीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, यात्रा कमिटीमार्फतही आवश्यक नियोजन केले जात आहे. एकूणच, साजगावची बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणजे केवळ देवदर्शनाचा सोहळा नसून श्रद्धा, परंपरा, व्यापार आणि ग्रामीण संस्कृतीचा वार्षिक उत्सव आहे. 21 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या यात्रेच्या स्वागतासाठी ग्रामस्थ, भाविक आणि व्यापारी सज्ज झाले असून पंचक्रोशीला आता यात्रेची ओढ लागली आहे.
खरेदीची रेलचेल
धार्मिक महत्त्वाबरोबरच साजगावची यात्रा पारंपरिक बाजारपेठेसाठीही प्रसिद्ध आहे. बैल बाजार हे यात्रेचे खास वैशिष्ट्य असून शेतकरी आणि पशुपालकांसाठी तो महत्त्वाचा आकर्षणबिंदू ठरतो. याशिवाय सुकी मच्छी, घोंगड्या, चादरी, विविध घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ आणि गरमागरम जिलेबीच्या दुकानांनी यात्रेची बाजारपेठ सजणार आहे. आकाशपाळणे आणि विविध मनोरंजनाची साधने लहान मुलांसह आबालवृद्धांचे लक्ष वेधून घेणार आहेत.
आर्थिक उलाढालीची संधी
15 दिवस चालणाऱ्या या यात्रेमुळे परिसरात मोठी आर्थिक उलाढाल होते. बाहेरील व्यापारी, व्यावसायिक आणि छोटे विक्रेते मोठ्या संख्येने साजगावमध्ये दाखल होत असल्याने स्थानिक व्यवसायालाही चालना मिळते. ग्रामीण भागातील पारंपरिक बाजारपेठ आणि लोकसंस्कृती जिवंत ठेवण्याचे काम ही यात्रा अनेक वर्षांपासून करीत आहे.






