| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बेलकडे ते कुरुळ रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र, नियोजनाअभावी वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसत आहे. नुकताच वाहतूक कोंडीत अडकून एका दोन वर्षाच्या मुलाचा उपचाराविना मृत्यू झाला. त्यामुळे बालकाच्या मृत्यूप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केली. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना बुधवारी (दि.18) निवेदन दिले. तसेच, मृत बालकांच्या कुटूंबियांना संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडून 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, असेही निवेदनातून नमुद केले आहे. यावेळी शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, अलिबाग पंचायत समितीच्या सदस्या अंजली ठाकूर, नयन पाटील, विभागीय चिटणीस संदीप गायकवाड, शोधन ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत अलिबाग- रेवदंडा मार्गावरील रखडलेले कुरुळ ते बेलकडेचे काम गेल्या काही दिवसांपुर्वी सुरू करण्यात आले. हा मार्ग कायमच वर्दळीचा आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे, नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी आवश्यक नियोजन करणे गरजेचे होते. ठेकेदारासह संबंधित यंत्रणेची ही जबाबदारी होती. हे काम दिवाळीनंतर सुरु करण्याची सुचना वाहतूक विभागाने दिली होती. तरीदेखील त्याकडे दूर्लक्ष करीत ठेकेदाराने काम सुरु केले. मात्र, ठेकेदारांनी रस्त्याचे काम करताना योग्य नियोजन व पर्यायी वाहतूक व्यवस्था केली नाही. त्याचा फटका या मार्गावरील प्रवाशांना बसला. तासनतास एकाच ठिकाणी वाहने उभी राहिल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमध्ये अडकून एक वर्षे आठ महिन्याच्या आरांश ठाकूर या बालकाचा उपचाराविना मृत्यू झाला. कोंडीत अडकल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात वेळेवर पोहचता आले नाही. या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार, अधिकारी, तसेच जबाबदार यंत्रणाची चौकशी करून दोषींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर मृत बालकांच्या कुटूंबियांना संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडून 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. या मागणीची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी. तसेच, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. अन्यथा शेकापच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी दिला.
अलिबाग-रेवस मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. त्याचा फटका प्रवाशांसह पर्यटकांना बसत असून, वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ठेकेदारांनी योग्य नियोजन करावे. पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी. दिशा दर्शक फलकांचा अभाव असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. ज्या रस्त्याची कामे पुर्ण झाली आहेत, त्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली साईट पट्टी तात्काळ भरण्यात यावी.
संदीप गायकवाड,
विभागीय चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष






