10 लाख रूपयांहून अधिक नुकसान
| पेण | प्रतिनिधी |
ऐन लग्नसराईच्या हंगामात पेण-खोपोली बायपासवरील मंडप डेकोरेशनच्या साहित्याच्या गोदामाला बुधवारी (दि.18) आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे 10 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेण-खोपोली बायपासवरील एच.पी. पेट्रोल पंपासमोरील मंडप डेकोरेशनच्या साहित्याच्या गोदामाला बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच पेण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन पथकानेही मदतकार्य सुरू केले. मात्र, वाऱ्याचा वेग असल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दोन्ही पथकांच्या अथक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. या कारवाईमुळे गोदामातील काही साहित्य वाचवण्यात यश आले; अन्यथा संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता होती.
हे गोदाम भाड्याच्या जागेत असून, मंडप डेकोरेशन व्यावसायिक समीर सोनी यांचे असल्याची माहिती मिळाली आहे. ते मुंबईतील घाटकोपर येथील रहिवासी आहेत. गोदामात साठवून ठेवलेले 10 लाख रुपयांहून अधिकचे मंडप सजावटीचे साहित्य, कपडे आणि इतर वस्तू आगीत जळून आर्थिक नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या आठवडाभरात पेण परिसरात आग लागण्याची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.






