38 लाख भरले, तरी घराचा ताबा नाही
| पनवेल | प्रतिनिधी |
आयुष्यभराची पुंजी आणि गृहकर्जाची रक्कम घरासाठी भरूनही हक्काच्या सदनिकेचा ताबा मिळत नसल्याने तळोजा सेक्टर 36 मधील विजयदुर्ग हिल्स्टा प्रकल्पातील 250 कुटुंबांची फरफट सुरू आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळाले, न्यायालयीन स्थगितीही नाही; तरी सिडकोकडून ताबा देण्यास विलंब होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या सिडकोच्या गृहनिर्माण सोडतीत या प्रकल्पातील सदनिका मिळालेल्या लाभार्थ्यांनी घराची संपूर्ण रक्कम भरली आहे. प्रत्येकाने अंदाजे 33 ते 38 लाख रुपये जमा केले असून, सुमारे 250 कुटुंबे ताब्याच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे, नोव्हेंबर 2025 मध्ये प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असतानाही न्यायालयीन प्रकरणाचे कारण पुढे करून ताबा प्रक्रिया रखडवण्यात आली. मात्र, सिडकोने 14 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, मुंबई उच्च न्यायालयातील याचिका 27 ऑगस्ट रोजी फेटाळण्यात आली असून, सध्या कोणतीही स्थगिती लागू नाही. न्यायालयीन अडथळा दूर झाल्यानंतरही ताबा का दिला जात नाही, असा सवाल लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे सिडको नव्या सोडतीची तयारी करीत असताना जुन्या सोडतीतील विजेत्यांना मात्र स्वतःच्या घरासाठी झगडावे लागत आहे. विजयदुर्ग हिल्स्टा गृहप्रकल्प समितीचे प्रतिनिधी अभिजीत हांडे, सचिन केसरे आणि पांडुरंग टेंभरे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. घराचा ताबा मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना गृहकर्जाचा हप्ता आणि सध्याच्या घराचे भाडे असा दुहेरी आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.






