उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे परिसर हा गुजरातमधील जामनगर सारखा विकसित करून अशा भुलथापा देणाऱ्या रिलायन्स कंपनी प्रशासनाचा खरा चेहरा हळूहळू समोर येऊ लागला आहे. रिलायन्स कंपनीकडून नागोठण्यात 70 हजार कोटी रुपयांच्या नवीन विस्तारित प्रकल्पाचे काम सुरू असतानाच नागोठण्याजवळील वरवठणे गावातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रिलायन्सच्या वरवठणे येथील मिनी टाऊनशिप समोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारी (दि.20) उपोषणाचा पाचवा दिवस उजाडूनही कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाने उपोषण सोडविण्यासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.
रिलायन्स व एल ॲण्ड टी कंपनीचे 3,500 कामगार मिनी टाऊनशिपमध्ये वास्तव्यास असून, त्यांच्या वापरातील सांडपाणी व मलमूत्रमिश्रित पाणी शेतात जात असल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचा वरवठणे ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांची नुकसानभरपाई द्यावी. वरवठणे तलावातील गाळ पुन्हा तलावात गेल्याने तसेच मिनी टाऊनशिपमधील सांडपाणी तलावात येत असल्याने तलावाची स्वच्छता करावी, संरक्षण भिंत उभारावी व बाजूच्या गटाराचे योग्य बांधकाम करावे, गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एल ॲण्ड टी कंपनीत रोजगार उपलब्ध करून द्यावा आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी वरवठणे गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी 16 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यात गणपत म्हात्रे, किशोर म्हात्रे, मोरेश्वर म्हात्रे, देवीचंद भोय, धर्मा म्हात्रे, रमेश म्हात्रे, कृष्णा म्हात्रे हे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य करून त्याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहील, असा ठाम इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.






