धावपट्टीवर विमानांची लगबग; विमानप्रेमींना अनोखे दृश्य
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर नवी मुंबई आणि पनवेल परिसराच्या आकर्षणात मोठी भर पडली आहे. विमानतळावरून होणारी विमानांची ये-जा पाहण्यासाठी नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. आज विमानतळाच्या धावपट्टीवर देशांतर्गत तसेच परदेशी प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानांचे आगमन होत असून, काही विमाने उड्डाणासाठी सज्ज असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
विमानतळाच्या धावपट्टीवर एकामागोमाग एक विमानांची हालचाल सुरू असते. काही मिनिटांपूर्वी आकाशातून झेपावत आलेले विमान धावपट्टीवर उतरते, तर दुसरीकडे पुढील उड्डाणासाठी दुसरे विमान सज्ज होते. विमानतळ परिसरात दिसणारी ही लगबग विमान वाहतुकीचे वाढते महत्त्व अधोरेखित करत आहे. पूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांचे उड्डाण आणि आगमन पाहण्याची संधी मिळत होती. मात्र, आता नवी मुंबईतच आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याने पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांना विमान वाहतुकीचे नवे केंद्र जवळ आले आहे. विमानतळावर प्रवासी विमानांबरोबरच मालवाहू विमानांचीही ये-जा सुरू असल्याने विमानतळाच्या विविध कामकाजाची नागरिकांना माहिती मिळत आहे. देशाच्या विविध भागांशी तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांशी हवाई संपर्क वाढण्याच्या दृष्टीने या विमानतळाकडे पाहिले जात आहे.
विमानतळाच्या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांचे लक्षही धावपट्टीवरील विमानांकडे वेधले जात आहे. मोठ्या आकाराची विमाने धावपट्टीवर वेग घेताना आणि आकाशात झेपावताना पाहण्यासाठी अनेक जण थांबून ही दृश्ये टिपत आहेत. छायाचित्रकार आणि विमानप्रेमींसाठीही हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलची ओळख केवळ औद्योगिक किंवा निवासी शहरापुरती मर्यादित न राहता जागतिक हवाई वाहतुकीच्या नकाशावर ठळकपणे निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विमानांची ही वाढती लगबग पाहता येत्या काळात या परिसराच्या विकासाला नवी गती मिळण्याची शक्यता आहे.
एकीकडे धावपट्टीवर उतरणारी विमाने, तर दुसरीकडे उड्डाणासाठी सज्ज असलेली विमाने, असे चित्र सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहायला मिळत आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर पनवेल परिसराच्या बदलत्या रूपाची ही एक झलक ठरत आहे.






