| आगरदांडा | प्रतिनिधी |
भारतीय तटरक्षक दलाचे नव्याने सेवेत दाखल झालेले होव्हरक्राफ्ट बुधवारी (दि.25) गोवा येथून गुजरातकडे जात असताना सकाळी 8.30 वाजता मुरुड येथे समुद्रकिनारी दाखल झाले. या प्रवासादरम्यान होव्हरक्राफ्टने श्रीवर्धन ते अलिबाग या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गस्त घालत सागरी टेहळणी व निगराणी मोहीम राबवली. सागरी क्षेत्रातील हालचालींवर सतत लक्ष ठेवणे, किनारी सुरक्षेचा आढावा घेणे आणि सागरी सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे मुरुड आयसीजी कमांडर-अभिषेक करुणाकर यांनी सांगितले. या मोहिमेमुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सागरी निगराणीला बळ मिळाले असून, भारतीय तटरक्षक दलाची सागरी हितसंबंधांचे संरक्षण, किनारी सतर्कता आणि कार्यात्मक सज्जता कायम राखण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.






