| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील (क्र. 548 अ) अत्यंत महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण असलेल्या पाली फाटा येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पाली फाटा हा विविध महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा मुख्य केंद्रबिंदू आहे. या ठिकाणाहून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, खोपोली, खालापूर तसेच पेणकडे जाणारे प्रमुख मार्ग आहेत. त्यामुळे या चौकात नेहमीच वाहनांची मोठी गर्दी असते. चारही बाजूंनी ये-जा करणाऱ्या अवजड व हलक्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे येथे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो आणि काही मिनिटांतच वाहनांच्या लांब रांगा लागतात.
दिवसभर या ठिकाणी वाहनांची वर्दळ असतेच, मात्र सकाळी व सायंकाळच्या वेळी येथील परिस्थिती अधिकच बिकट होते. नजीकच्या इमॅजिका थीम व वॉटर पार्कमध्ये पर्यटनासाठी आलेली आणि सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघालेली वाहने मोठ्या प्रमाणावर या मार्गावर येतात. त्यातच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे व पेण-खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची भर पडल्याने पाली फाट्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. सुट्टीच्या दिवशी तर यामध्ये आणखीनच भर पडते.
वारंवार होणाऱ्या या कोंडीमुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जात असून इंधनाचाही अपव्यय होत आहे. तसेच, रुग्णवाहिका किंवा अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. तसेच याठिकाणी नाक्यावर रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे. पाली फाट्यावरील वाहतुकीचे योग्य नियोजन करून येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस किंवा नियंत्रकांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिक व प्रवाशांमधून केली जात आहे.






