कोलाड उड्डाणपूल, भिरा फाटा परिसरातील पथदिवे बंद; प्रशासनाचे दुर्लक्ष
। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कोलाड उड्डाणपूल, भिरा फाटा ते रेल्वे स्टेशन परिसरातील पथदिवे गेल्या 15 दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी या महामार्गांवर प्रचंड अंधार पसरत आहे. यामुळे या महामार्गवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणीच अंधाराचे साम्राज्य पसरल्याने अपघातांचा धोका वाढला असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड उड्डाणपूल आणि भिरा फाटा हा परिसर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या महामार्गावरून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात दुचाकी, रिक्षा, मिनिडोअर, फोरव्हीलर, एसटी बस तसेच अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे या परिसरात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
या महामार्गावर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे रस्त्याचा अंदाज घेणे, वाहनांची हालचाल ओळखणे तसेच पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत एखादी मोठी दुर्घटना घडून कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभाग व प्रशासन यांनी आणखी विलंब न लावता या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
गेल्या 15 दिवसांपासून बंद असलेले स्ट्रीट लाईट तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.






