बारव, शिवमंदिर अन् दुर्मिळ शिल्पांचे अवशेष; कोकणच्या प्राचीन वैभवाचे दर्शन
| माणगाव | सलीम शेख |
आजच्या नकाशावर साधेसे दिसणारे माणगाव तालुक्यातील चांदोरे गाव आपल्या उदरात तब्बल 800 वर्षांचा समृद्ध इतिहास जपून आहे. शिलाहार काळापासून मराठा राजवटीपर्यंत आणि ब्रिटिश सत्तेच्या उंबरठ्यापर्यंतच्या इतिहासाच्या पाऊलखुणा येथे पुरातत्त्वीय अवशेषांच्या रूपाने समोर आल्या आहेत. प्राचीन बारव, हर-गौरी शिल्प, शिवमंदिराचे भग्नावशेष, वीरगळ, सतीशिळा आणि दुर्मिळ शिळांमुळे चांदोरे हे कोकणच्या ऐतिहासिक वैभवाचे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरून कोकणातील किनारपट्टी आणि बंदरांकडे जाणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गावर चांदोरेचे महत्त्वाचे स्थान होते. माणगाव, गोरेगाव आणि किनारपट्टीला जोडणाऱ्या या मार्गावरून व्यापारी, प्रवासी आणि मालवाहतूक होत असे. उत्खननात सापडलेली विविध कालखंडांतील नाणी, टेराकोटाच्या बांगड्यांचे तुकडे आणि वास्तूंचे अवशेष येथील तत्कालीन आर्थिक व सामाजिक जीवनाची साक्ष देतात.
चांदोरेतील सर्वाधिक लक्षवेधी ठेवा म्हणजे जांभ्या दगडात बांधलेली प्राचीन पायऱ्यांची बारव. या जलरचनेतील देवकोष्ठात शिव-पार्वतीचे सुंदर हर-गौरी शिल्प आढळले आहे. स्थापत्य आणि शिल्पकलेच्या वैशिष्ट्यांवरून त्याचा संबंध शिलाहार काळाशी जोडला जातो. चांभारपाड्याजवळ प्राचीन शिवमंदिराचे गर्भगृह, दगडी अधिष्ठान, मंदिराच्या जोत्याचे अवशेष आणि भग्न नंदीशिल्पही आढळले आहेत.
परिसरात आढळणाऱ्या गाय-वासरू शिळा, वीरगळ आणि सतीशिळा या येथील तत्कालीन सामाजिक जीवनाची आणि संघर्षांची कहाणी सांगतात. जमिनीच्या सीमा निश्चित करणे किंवा भूमिदानाच्या नोंदींसाठी अशा शिळांचा वापर होत असल्याचे अभ्यासक सांगतात. स्थानिक परंपरेतील ‘कलाविणीचे घरते’ हे ठिकाणही पूर्वी व्यापारी किंवा प्रवाशांच्या विसाव्याचे ठिकाण असावे, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्ताराच्या काळातही या परिसराला भौगोलिक महत्त्व होते. जवळच जंजिऱ्याच्या सिद्दींचे प्रभावक्षेत्र असल्याने हा भाग राजकीय आणि लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचा होता. त्यामुळे चांदोरेचा इतिहास केवळ मंदिरांपुरता मर्यादित नसून व्यापार, संस्कृती, सत्ता आणि संघर्षाशी जोडलेला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्स्ट्रा-म्युरल स्टडीज (सीईएमएस) आणि संबंधित संशोधन संस्थांच्या माध्यमातून 2011 पासून झालेल्या उत्खनन व अभ्यासामुळे या गावाचा पुरातत्त्वीय वारसा उजेडात आला. मात्र, अनेक ऐतिहासिक अवशेष आजही दुर्लक्षित आणि विखुरलेल्या अवस्थेत आहेत. या वारशाचे शास्त्रोक्त संवर्धन, माहितीफलक, संरक्षित क्षेत्राची निश्चिती आणि ऐतिहासिक पर्यटनाची सुविधा निर्माण केल्यास चांदोरेला रायगडच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळू शकते. चांदोरेची माती केवळ भूतकाळ जपत नाही, तर कोकणच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहे. हा इतिहास उत्खननातून बाहेर आला; आता तो नष्ट होण्यापासून वाचवण्याची जबाबदारी प्रशासन आणि समाजाची आहे.
इतिहासाच्या साक्षीदार खुणा
चांदोरेच्या परिसरात आढळलेली प्राचीन बारव, हर-गौरी शिल्प, शिवमंदिराचे अवशेष, भग्न नंदी, गाय-वासरू शिळा, वीरगळ, सतीशिळा, नाणी आणि टेराकोटाच्या बांगड्यांचे तुकडे हा अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे. या प्रत्येक अवशेषातून तत्कालीन जलव्यवस्थापन, धार्मिक परंपरा, व्यापार आणि समाजजीवनाचे दर्शन घडते. योग्य संवर्धन झाले, तर चांदोरे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचे आकर्षण ठरू शकते.










