माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पीडितेला एक लाखांची नुकसान भरपाई
| माणगाव | प्रतिनिधी |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी रवी भाऊ सुतार याला माणगाव येथील विशेष न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच विविध कलमांनुसार दंड ठोठावत पीडित मुलीला एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल 27 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायाधीश एम.के. पाटील यांनी दिला.
महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसाने कांबळे येथे ही घटना घडली होती. आरोपीने पीडित मुलगी कामावरून घरी परतत असताना तिला मोटारसायकलवरून सावित्री नदीकिनारी निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निशेष तांबे आणि पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयीन सुनावणीत पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वपूर्ण ठरले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. योगेश तेंडुलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासून प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्याचे मान्य केले. न्यायालयाने भादंवि कलम 376 आणि पॉक्सो कलम 4 अन्वये आजन्म कारावास व 20 हजार रुपये दंड, भादंवि कलम 506 अन्वये दोन वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंड, तर पॉक्सो कलम 7 व 8 अन्वये तीन वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच पीडितेला एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या प्रकरणाच्या तपासात आणि न्यायालयीन कामकाजात पोलीस अधिकारी संतोष माने, पोलीस शिपाई छाया कोपनर, पोलीस हवालदार पी.बी. कोकरे तसेच महाड शहर पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.






