125 कोटींचा प्रकल्प; सात मजली प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजनाची तयारी सुरू
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मुहूर्त अखेर जवळ आला आहे. तब्बल 43 वर्षे जुन्या ‘शिवतीर्थ’ इमारतीच्या जागी 125 कोटी रुपये खर्चून सात मजली भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. डिसेंबरअखेर भूमीपूजन होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून तयारीला वेग आल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम 1978 मध्ये सुरू झाले होते. तत्कालीन अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या पुढाकारातून अलिबागमध्ये ही भव्य इमारत उभारण्यात आली. 1983 मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीला ‘शिवतीर्थ’ असे नाव देण्यात आले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांची कार्यालये एकाच छताखाली आणण्याची संकल्पना त्यामागे होती. मात्र, कालांतराने इमारत जीर्ण झाली. पावसाळ्यात गळती, भिंती आणि छतांची वारंवार दुरुस्ती करावी लागत होती. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती पाडण्यात आली. आता याच जागेवर नवी प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नव्या इमारतींसाठी सुमारे 125 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुण्यातील मे.टी. अँड टी. इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला बांधकामाचे काम देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेची इमारत सात मजली, तर अलिबाग पंचायत समितीची इमारत पाच मजली असणार आहे. नव्या बांधकामासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा आणि भूमीपूजनाची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर भूमीपूजन होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, नव्या इमारतीच्या भूमीपूजनाची तारीख निश्चित करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर अधिकृत तारीख जाहीर होईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
अशी असेल नवी इमारत
जिल्हा परिषद इमारत सात मजली असून, तळमजल्यावर संपूर्ण पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, अर्थ व बांधकाम विभाग एकाच छताखाली. सुमारे 550 कर्मचाऱ्यांसाठी प्रशस्त जागा. अभियंत्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा आणि संरक्षक भिंतीची सुविधादेखील असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन लवकरच होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्व संबंधितांची एकत्रित बैठक घेऊन भूमीपूजनाची तारीख निश्चित केली जाईल. डिसेंबरअखेरपर्यंत भूमीपूजन होईल, अशी अपेक्षा आहे.
मधुकर पाटील,
उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती,
रायगड जिल्हा परिषद







