सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात आता पोलिसांच्या मदतीला ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य असणार आहेत. बुधवारी (ता.15) पाली पोलीस स्थानकात रोहा उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुधागड तालुक्यातील ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
यावेळी गावातील युवकांची ग्रामसुरक्षा दलासाठी निवड करण्यात आली. निवडलेल्या सदस्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने ग्रामसुरक्षा दलाचा लोगो असलेले डकपडे व इतर साहित्य देण्यात आले. यावेळी किरणकुमार सूर्यवंशी यांनी उपस्थित ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना कायदेशीर मार्गदर्शन व ग्राम संरक्षक पथकाचे स्थापनेचे उद्दिष्ट रचना व कार्य समजावून सांगितले आणि मार्गदर्शन केले. पाली पोलीस स्थानका अंतर्गत येणार्या सर्वच गावांत ग्रामसुरक्षा दल स्थापन केले असल्याचे पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रोहा किरणकुमार सूर्यवंशी, पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे, पोलीस हवालदार प्रफुल्ल चांदोरकर, पोलीस नाईक शेडगे यांच्यासह ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य मोठ्या उपस्थित होते.
ग्राम सुरक्षा दलाच्या जबाबदार्या
या सदस्यांनी रात्रीच्या वेळी गावात गस्त घालणे, वेळप्रसंगी नागरिक व पोलिसांची मदत करणे,वाहन अपघात प्रसंगी तातडीने मदत करणे, नैसर्गिक आपत्तीचे वेळी मदत करणे, लोकांच्या संरक्षणासाठी मदत करणे, मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमणूक दिलेले काम करणे. सार्वजनिक सुरक्षितेसाठी कर्तव्य बजावणे, वाहतूक कोंडीच्या वेळी मदत मागितल्यास पोलिस दलास मदत करणे. साथरोगाचे कार्यालयात मदत मागितल्यास कर्तव्य बजावणे इत्यादी जबाबदार्या पार पडायच्या आहेत.