। अलिबाग । भारत रांजणकर ।
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून आपल्याच 67 वर्षाच्या सख्ख्या मोठया भावाची घराच्या अंगणातच गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथे घडली. या हत्येप्रकरणी सैन्यातून निवृत्त झालेल्या भावाला दादर सागर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, संतोष राम पाटील (वय 40 रा.हनुमानपाडा ता.पेण) यांचे वडील राम हरीभाउ पाटील (वय 67) व चुलते पांडुरंग हरीभाउ पाटील (वय 59 दोन्ही रा.हनुमानपाडा ता.पेण) यांच्यात मागील काही वर्षापासुन वडीलोपार्जित जमिन वाटपावरून वाद सुरु होता. रविवार (दि.26) यांतील आरोपी परेश पांडुरंग पाटील व राम हरीभाउ पाटील आणि त्यांची पत्नी प्रभावती व मुलगा संतोष यांच्यात घरासमोर वाद झाला. त्याबाबत संतोष राम पाटील व त्याची आई प्रभावती पाटील असे दादर सागरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले. त्याचवेळी पांडुरंग पाटील, परेश पाटील, (22) आणि शैला पांडुरंग पाटील (55) सर्व रा.हनुमानपाडा पो.जोहे ता.पेण यांनी राम पाटील यांच्या घरासमोर जावुन शिवीगाळी केली. तसेच पांडुरंग पाटील याने त्याच्याकडे असलेली बारा बोर रायफलने राम पाटील यांच्या छाती आणि पोटावर गोळ्या झाडत हत्या करून तेथुन पळ काढला. या घटनेची माहीती मिळताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, पोलीस उप निरीक्षक श्री.भउड कर्मचार्यांसह घटनास्थळी पोहचले.
सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे साो. रायगड अलिबाग, उप विभागिय पोलीस अधिकारी पेण विभा वि. चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत सुचना देत मार्गदर्शन केले. त्यानुसार पथक तयार करून गुन्हयातील फरार आरोपींचा शिताफिने शोध घेतला असता यातील महिला आरोपी शैला पांडुरंग पाटील ही हनुमानपाडा गावात सापडली. तिला महिला पोलीस हवालदार सारीका पाटील यांनी ताब्यात घेवून चौकशी केली. तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने आरोपी पनवेलला गेल्याची माहीती दिली. त्याप्रमाणे पनवेल येथे जावून माहीती काढुन पांडुरंग पाटील आणि परेश पाटील यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने महिला आरोपीत शैला पाटील हिला देखील अटक करण्यात आली आहे.