जयंत माईणकर
1998 साली अशीच एक तथाकथित धर्म संसद अहमदाबादला आयोजित केली होती. त्या धर्म संसदेचे आयोजन केले होते तेव्हाचे विश्व हिंदू परिषदेचे महासचिव डॉ. प्रविण तोगडिया यांनी. आणि तशी संसद आयोजित करण्याची प्रेरणा दिली होती तेव्हाचे पंतप्रधान स्व अटल बिहारी वाजपेयी यांनी.
26 डिसेंबरला रायपूरच्या धर्म संसदेत महाराष्ट्रातल्या अकोल्याचे साधू कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींना अपशब्द वापरत त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेला वंदन केलं हे पाहून ही धर्मसंसद नसून अधर्म संसद आहे असं म्हणावसं वाटतं. त्यात समाधानाची बाब ही की काही साधू संतांनी या कालीचरणच्या भाषणाला विरोध केला.
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही गरज पडल्यास जीवही घेऊ, अशा आशयाची शपथ उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये धर्मसंसदेत उपस्थितांना देण्यात आली होती. ही धर्म संसद 17 ते 19 डिसेंबर दरम्यान हरिद्वार येथे भरली होती.
त्यानंतर 26 डिसेंबरला ही धर्म संसद रायपूरला भरविण्यात आली होती. तिथे अकोल्याला जन्माला आलेल्या अभिजित सारग उर्फ कालीचरण महाराज या व्यक्तीने गांधीद्वेष आणि गोडसे स्तुतीची जी मुक्ताफळे उधळली त्यामुळे या ‘अधर्म संसदेची’ लायकी सर्वानाच कळली.
कालिचरण महाराज आहेत अकोल्याचे. मध्यंतरी देशभरात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. एका तरूण साधूनं गायिलेल्या ‘शिवतांडव स्तोत्रा’चा हा व्हिडीओ. ‘यु-ट्यूब’वर जगभरातील लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या तरूण साधूचं नाव ‘कालीचरण महाराज’.
अकोल्यातील ‘कालीपुत्र’ कालिचरण महाराज यांनी मध्यप्रदेशातील भोजपुर येथे एका शिवमंदिरात शिवतांडव स्तोत्र गायिलं. त्यांच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील भोजपूर गावातल्या सोमनाथ शिवमंदिरातील होता.
‘कालीचरण महाराज’ अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचं मुळ नाव ‘अभिजीत धनंजय सराग’. शिवाजीनगर भागातील धनंजय आणि सुमित्रा सराग या दांपत्याच्या पोटी कालीचरण महाराज यांचा जन्म झाला. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्यांना तो शिकावा, काहीतरी वेगळं काम करावं असं वाटायचं. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा ‘कालीपुत्र कालीचरण’ झाला. पुढे लोकांनी त्यांना ‘महाराज’ संबोधनं सुरू केलं. मात्र, ‘कालीचरण महाराज’ स्वत: आपण महाराज नव्हे तर ‘कालीमाते’चा भक्त आणि पुत्र असल्याचं सांगतात.
धर्म संसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द बोलणार्या कालीचरण महाराजांची भूमिका बदललेली नाही. रायपूरमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर कालीचरण यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्याचबरोबर महात्मा गांधींना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्याने आपल्याला कोणताही पश्चाताप होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी गांधींचा विरोधक आहे, अशा एफआयआरमुळे काही फरक पडत नाही, पश्चाताप नाही. मी गांधींचा तिरस्कार करतो. यासाठी मला फाशी झाली तरी चालेल, असं कालीचरण महाराज म्हणाले.
धर्मसंसद म्हणजे धर्माशी निगडीत मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केलेली परिषद. तुम्हाला एखाद्या धार्मिक मुद्द्याविषयी अधिक स्पष्टता हवी असेल, विवाहासंदर्भातल्या किंवा अन्य एखाद्या विधीमध्ये काही समस्या येत असेल किंवा बदल करायचे असतील, एखादी धर्मविषयक समस्या सोडवायची असेल, तर मोठ्या धर्मगुरूंना बोलवलं जातं. यात शास्त्र संमत काय निर्णय असावा हे ठरवलं जातं. भारतात आदि शंकराचार्यांशी निगडीत चार प्रमुख मठ असून सामान्यतः त्यांचे अधिपती धर्मग्रंथांचा अभ्यास करूनच महत्त्वाच्या धार्मिक मुद्यांवरचे निर्णय देऊ शकतात. अशा धर्म संसदेचा वापर संघ परिवार आपले विचार धर्माच्या आडून लोकांच्या माथी मारत असतो.
1998 साली अशीच एक तथाकथित धर्म संसद अहमदाबादला आयोजित केली होती. त्या धर्म संसदेचे आयोजन केले होते तेव्हाचे विश्व हिंदू परिषदेचे महासचिव डॉ. प्रविण तोगडिया यांनी. आणि तशी संसद आयोजित करण्याची प्रेरणा दिली होती तेव्हाचे पंतप्रधान स्व अटल बिहारी वाजपेयी यांनी. विषय होता गुजरात मधील डांग या आदिवासी जिल्ह्यातील काही विशिष्ट धर्माच्या प्रार्थना स्थळांवर झालेल्या हल्ल्यांंचा. या भागात ख्रिस्ती मिशनरी बर्याच प्रमाणात कार्यरत आहेत.त्या भागाचा दौरा करताना मला असं लक्षात आलं की हा संघर्ष धर्मपरिवर्तनाला विरोध पण तथाकथित घरवापसीला पाठिंबा या मुद्द्यावर आहे. म्हणजेच संघ परिवाराचा आदिवासींच्या धर्मपरिवर्तनाला विरोध होता मात्र आधीच ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेल्या आदिवासींना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याला हे लोक धर्मांतर न म्हणता ‘घरवापसी’ म्हणून त्याच स्वागत करत होते. मी वाजपेयींना पत्रकार परिषदेत धर्मांतराच्या या दुहेरी भूमिकेवर त्यांचं मत काय हा प्रश्न विचारला. वाजपेयी तेव्हा पत्रकारांशी संवाद साधायचे. तेव्हा आजच्यासारखी केवळ ‘मन की बात’ ऐका अशी परिस्थिती नव्हती. भाजपकडे तेव्हा केवळ 182 खासदार होते. तरीही वाजपेयीनी संघ परिवाराच्या विचारसरणीला धरून उत्तर दिलं, की ‘धर्मांतर आणि घरवापसी’ या मुद्द्यावर चर्चा व्हावी. पडत्या फळाची आज्ञा घेत डॉ. तोगडियांनी लगेच अहमदाबादला धर्म संसद आयोजित केली. आणि या धर्म संसदेचा सूर घरवापसीला पाठिंब्याचाच होता. गुजरातमध्ये या तथाकथित धर्मसत्तेचा एक अभिनव प्रयोग मला डिसेंबर 2002 ला निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाला. रोज काँग्रेस आणि भाजपची पत्रकार परिषद झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेची आचार्य धर्मेंद्र महाराज या नावाची एक व्यक्ती रोज पत्रकार परिषद घ्यायची. आपल्या हातात धर्मसत्ता आहे असा आव आणणारे हे महाशय आपल्या पत्रकार परिषदेत केवळ तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त जे एम लिंगडोह यांच्या ख्रिस्ती असण्यावर बोट ठेवायचे.आणि अर्थात सोनिया गांधींचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जायचा. धर्म, वंश, भाषा यांचा वापर करून सत्तेवर येणारे सत्ताधारी लोकशाहीला आणि मानवतेला नेहमी घातक असतात हा इतिहास हिटलर पासून आहे. मध्ययुगीन कालखंडात इंग्लंडसह सर्व देशांनी पोपचं वर्चस्व झुगारून दिलं.
मात्र एकविसाव्या शतकात भारतात धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचं एकत्रीकरण होताना दिसत आहे. आणि हे करत असताना खुनासारख्या गुन्ह्याचं उदात्तीकरण केलं जात आहे. आणि हेच फार धोकादायक आहे.
भारतात त्याची सुरुवात केव्हाच सुरु झालेली. धर्मसत्तेचं राजसत्तेवर होणार अतिक्रमण रोखलं पाहिजे. नाहीतर त्याचा धोका भारताच्या निधर्मी विचारसरणीला आणि लोकशाहीला असेल. तुर्तास इतकेच!






