नागरिकांकडून सूचना व नियमांची पायमल्ली
पेण | वार्ताहर |
पेणमध्ये आठ ते दहा दिवसांपूर्वी एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. परंतु, गेल्या आठवड्याभरात पेण तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. शासनाकडून वेळोवेळी योग्य सूचना देऊनही नागरिक सूचनांची व नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यातच पेण तालुक्यात राजकीय कार्यक्रमांना ऊत आलेला आहे.
एकीकडे कोरोनासंदर्भात नियमांचे पालन व्हावे यासाठी सरकारी बाबू प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे राजकीय मंडळी शेकडोने कार्यकर्ते जमवून आपल्या पक्षाची ताकद वाढवताना दिसत आहेत. त्यातच काही सुज्ञ संघटनादेखीले कोरोनाचे नियम तोडून आपले कार्यक्रम घेत आहेत. शुक्रवारीच आगरी हॉल येथे शिक्षक संघटनेने मोठा कार्यक्रम घेतला; परंतु त्यामध्ये कोणतेच नियम पाळले जात नव्हते. तसेच या कार्यमासाठी रितसर परवानाही न घेतले असल्याचे समजले. एकंदरीत, पेण तालुक्यात जो कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याची जबाबदारी राजकीय पक्षासोबत विनापरवानगी ज्या संघटना शासनाचे आदेश मोडून कार्यक्रम घेत आहेत, यांच्यावर टाकणे गरजेचे आहे. जर येत्या आठ दिवसांत पेण तालुक्यात योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर कोरोना संसर्गाचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. पेण शहरात तर विनामास्क फिरणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विनामास्क फिरणार्यांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्याची स्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. तरी, याबाबीकडे जिल्हाधिकार्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.







