तळा | वार्ताहर |
कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देणार असल्याचा विश्वास दिला आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने आ. बाळाराम पाटील यांचा तळा तालुका शिक्षक संवाद दौरा बोरघर हायस्कूल येथे दि. 7 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करणे, अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण मिळवून देणे, घोषित व अघोषित शाळांचे प्रश्न मार्गी लावणे, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे प्रश्न सोडवणे, पात्र-अपात्र शाळांचे प्रश्न, प्राथमिक शाळा बंद न पडू देणे, 40 टक्के टप्प्यातील शाळेचे मागील वेतन अदा करणे, अंशतः अनुदानित शिक्षकांचे समायोजन करणे आदी प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक रसाळ, शेकापचे तालुका सरचिटणीस धनराज गायकवाड, निवृत्त प्रा. आर.के. म्हात्रे, निवृत्त मुख्याध्यापक बी.पी. म्हात्रे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे युवाध्यक्ष देवा पाटील, बोरघर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, तळा तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, सचिव मंगेश देशमुख यांनी आ. बाळाराम पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुख्याध्यापक श्री. धुमाळ, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.