कैद्याला आवश्यक सामान व सुविधा पुरविण्यासाठी मागितली लाच
अलिबाग | भारत रांजणकर |
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला आवश्यक सामान आणि सुविधा पुरविण्यासाठी त्याच्या पत्नीकडून 4 हजार रुपयांची लाच घेताना अलिबाग जिल्हा कारागृहाची जेलर (श्रेणी 2) सुवर्णा जनार्दन चोरगे हिला रायगड लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबतचे वृत्त असे की तक्रारदार महिलेचे पती न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृह अलिबाग येथे आहेत. त्यांना जेलमध्ये आवश्यक सामान आणि सुविधा पुरविण्याची विनंती २१ जून रोजी महिला जेलर सुवर्णा जनार्दन चोरगे वय ३४ राहणार ड्रेफोडीलास, गोंधलपाडा, मूळ राहणार रामराज ता अलिबाग, यांच्याकडे केली. त्यासाठी सुवर्णा चोरगे यांनी सदर महिलेकडे ४ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे सदर महिलेने याची तक्रार रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची खात्री करून पोलीस उप अधीक्षक सुषमा सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. त्यानुसार २२ जून रोजी सदर महिलेकडून ४ हजार रुपयांची लाच घेताना या पथकाने रंगेहाथ पकडले. या पथकात पोलीस हवालदार दिपक मोरे, विशाल शिर्के, महेश पाटील, महिला पोलीस नायक स्वप्नाली पाटील, पोलीस नायक जितेंद्र पाटील आदींचा सहभाग होता.