रत्नागिरीत पावसाच्या सरी
आंबा, काजू बागायदारांना फटका
रत्नागिरी | वृत्तसंस्था |
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी पहाटेपासून सात वाजेपर्यंत पाऊस पडला. या पावसाने बागायतदारांना फटका बसला. पावसामुळे कैरीची गळ झाली असून, मोहोरावरही बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसानंतर दिवसभर वेगवान वारे वाहत असून, हवेत प्रचंड गारवा होता.
शनिवारी (ता. 8) दिवसभर आकाश निरभ्र होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत हलका शिडकावा झाला. त्यानंतर मध्यरात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. रविवारी सकाळी सुमारे दोन तासांहून अधिक काळ पावसाने चांगला दणका दिला. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. कच्चे रस्ते चिखलमय झाले होते. त्यामधून वाहने हाकणेही जिकिरीचे झाले. रविवारी सकाळी काही काळ मळभी वातावरण होते. दिवसभर वेगवान वारेही वाहत होते. दिवसभरात कमाल तापमान 27 अंश, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मुंबई-गोवा महामार्गावर काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ते निसरडे झाले होते.
फवारणीचा खर्च वाढणार
अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकावर झाला आहे. अवकाळीमुळे औषध फवारणीचा खर्च वाढणार असून, आर्थिक भुर्दंड आंबा बागायतदारांना बसणार आहे. मोहोरावर बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे. पावसामुळे कणीसह कैरी गळून गेली. त्यामुळे बागायतदार चिंतेत पडले आहेत.
पावसामुळे हापूसचे नुकसान झाले असून, मोहोरावरील रोगराई टाळण्यासाठी औषध फवारणी करावी लागणार आहे. आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
देवेंद्र झापडेकर, बागायतदार