तहसीलदारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी
| पालशेत | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांप्रमाणेच गुहागर तालुक्यातील पालशेतमध्येही गेल्या शुक्रवारी ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नदीला आलेल्या महापुरामुळे येथील निवासी, वाणिज्य आणि कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला. तहसीलदार यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पूरपरिस्थितीची पाहणी केली. पालशेतमधील चार महसूली गावांपैकी पालशेत, बारभाई आणि मारुती मंदिर या महसूली गावातील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. पालशेत मंडळ अधिकारी प्रशांत कानिटकर, ग्रामसेवक रायकर, पोलीस पाटील सुयोग नरवणकर आणि सहकाऱ्यांनी सर्व नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तातडीने पंचनामे पूर्ण केले.
यामध्ये निवासी आस्थापने 42, वाणिज्य आस्थापने 8, इतर 2 आणि कृषी पंप 1 अशा 53 नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. झालेल्या पंचनाम्यांनुसार एकूण 19 लाख 62 हजार सातशे साठ रुपयांचे नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या प्रचंड पुराचे पाणी वस्ती आणि दुकानांमध्ये शिरल्याने ग्रामस्थांच्या निवासी वापराच्या फ्रिज, वॉशिंग मशिन अशी विद्युत उपकरणे, अन्य घरगुती वापराच्या वस्तु तसेच व्यावसायिकांचा माल आणि शेतकरी बागायतदारांचे कृषिपंप आदी निकामी झाले आहेत.
पालशेतमधील आजवरच्या सर्वात मोठ्या या महापुराने ग्रामस्थांची, व्यावसायिकांची सर्वांचीच दाणादाण झाली. अनेकांच्या राहत्या घरात, दुकानात पुराचे पाणी शिरल्याने तसेच काही ठिकाणी दरड कोसळल्याने डोंगराच्या ओढ्याचे पाणी घरात शिरल्याने झालेले नुकसान खूप मोठे आहे. झालेल्या पंचनाम्यांनुसार 53 नुकसानीच्या घटनांमध्ये ग्रामस्थ, व्यावसायिक आणि शेतकरी-बागायतदारांचे 19 लाख 62 हजार सातशे साठ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मंडळ अधिकारी प्रशांत कानिटकर यांनी दिली आहे. झालेल्या पंचनाम्यांनुसार नुकसानग्रस्तांना समाधानकारक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
बागायतदार पंचनाम्याच्या प्रतीक्षेत
नदीच्या मुख्य प्रवाहातील बेटावर असलेल्या नारळ-सुपारी बागायतींचे नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. नदीला पूर असल्याने हे पंचनामे होऊ शकले नाहीत. अजूनही नदीची पाणीपातळी जास्त असल्याने बागायतदार पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत. नदीची पाणी पातळी कमी झाल्यानंतर संबंधित विभागाने रीतसर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा संबंधित बागायतदारांनी व्यक्त केली आहे.