प्रा डॉ एन डी पाटील काय होते तर ते पुरोगामी विचारांचा दीपस्तंभ होते शेतकरी कामगार पक्षाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होताच परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकारिणीत देखील ते एक महत्वाचा भाग होते.
शेकापक्षाचे १२ वे अधिवेशन अलिबाग येथे पार पडले. त्यावेळी शेकापक्षाला खूप मरगळ आली होती. या १२ व्या अधिवेशनात माझे संचलन, माझे काम, लाखाच्या संख्येत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जवळजवळ ५० हजार महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महिलांचे संघटन बघून त्यांनी मला थेट चिटणीस मंडळात घेतले. आणि महिला आघाडीची राज्याची प्रमुख केली. अट एकच ठेवली की तुला मांडी ठोकून चिटणीस मंडळाच्या बैठकीत बसावे लागेल. कारण तेंव्हा चिटणीस मंडळाची बैठक खूप वेळ चालायच्या, दहा दहा तास किंवा दोन तीन दिवस देखील या बैठका चालत असत. प्रत्येक आघाडीवर चर्चा होत असे. वेगवेगळ्या विचारांवर वैचारिक मंथन होत असे. त्याच्यापासून मला खूप काही शिकायला मिळाले. सगळ्यांसाठी एन डी पाटील साहेब असेल तरी ते आमच्या साठी एन डी पाटील काका होते. त्यांनी माझ्यावर मुलीसारखे प्रेम केले. ते गेल्यामुळे मला एक पितृछत्र हरपल्याचे दुःख झाले आहे.
माझ्या दादांचा पुनर्जन्म त्यांच्यामुळे झाला. दादांना पॅरलेसिस चा अटॅक येत असल्याचे लक्षात येताच दादा स्वतःच आमदार निवासाच्या शेजारी असलेल्या एका हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. आणि आपण ॲडमिट असल्याचे त्यांनी कळवले. तेंव्हा ताबडतोब एन डी पाटील आले. इकडे कुठे ठेवले प्रभाला असे विचारत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डीन डॉ गोयल यांच्याशी संपर्क साधून दादांना स्वतः हॉस्पटलमध्ये घेवून गेले. हॉस्पिटल ला दादांचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला. दादा गेल्यानंतर ते मला सांगायचे, बेबी, मी आहे ना, तू कशाला एवढी रडतेस. मात्र आज काका गेल्याचे कळले मला खूप दुःख झाले. मी जेवले देखील नाही. मला सारखे वाटायचे त्यांना भेटायला जावे. पण माझ्या आजारपणामुळे मी त्यांना शेवटच्या त्यांच्या आजाराच्या काळात त्यांना इन्स्पेक्शन होवू नये म्हणून भेटू देखील शकले नाही. हे मला एक कायमच शल्य राहिले आहे. शिक्षण मंत्री प्रा मधुकरराव चौधरी यांनी शिक्षणाविषयी एक श्वेत पत्रिका काढली. त्यावर एन डी पाटील यांनी त्यावर कृष्ण पत्रिका, कृष्ण कृत्य काढून ती श्वेत पत्रिका कशी चुकीची आहे हे समोर आणले. त्यामुळे ती श्वेत पत्रिका मधुकरराव चौधरी यांना म्हणजेच शासनाला मागे घ्यायला लावली. एवढी ताकद विरोधी पक्षाचा आमदार जर प्रतिभावान असेल तर काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. कापूस एकाधिकार योजना ज्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला. अनेक आंदोलने केली. शेकापक्षाच्या प्रत्येक लढ्यात ते सक्रीय असायचे. मग जेएनपीटी चा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा आंदोलन असेल शेती मालाला किफायतशीर भाव मिळवून देण्यासाठीचे आंदोलन असेल. वैजनाथ कमिटीच्या मागण्या मान्य व्हाव्यात त्यासाठी दिलेले अनेक लढे असतील. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जे जे करता येईल ते शेवटच्या क्षणापर्यंत करण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे आमचे कौटूंबिक संबंध होते. नेहमी घरी आले की ते आईला सांगायचे आमटी, भाजी, भाकरी असेल तरी ते आनंदाने ते खायचे. अशी त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी होती. जेवायला बसले की आम्हाला अनेक गोष्टी ते चळवळीच्याच सांगायचे. त्यातून आम्हाला खूप शिकता आले. अनेक विचार, शेतकरी चळवळ असेल, सहकार चळवळ असेल, कामगार हिताची चळवळ असेल, युवक चळवळ असेल या प्रत्येकावर त्यांचे वेगवेगळे विचार होते. ते विचार पुढच्या युवा पिढीला मार्गदर्शक असेच होते. त्यांच्या कडून आम्ही खूप काही शिकलो. वडिलांकडून राजकारणाचे धडे घेतले असेल तरी ते खरे गिरवले त्यांच्याकडून. समाजकारण शिकलो, त्यांच्या बद्दल संगायला आज शब्द देखील कमी आहेत. मला आठवते दादा गेल्यानंतर खुर्ची मध्ये मला मिठीत घेवुन बसलेले एन डी पाटील आज नाहीत, आज त्यांचा मायेचा हात माझ्या पाठीवरून फिरणार नाही. ही खंत आहे. खूप प्रेम केले त्यांनी माझ्यावर. माझे वडील माझे दादा मला म्हणाले, बेबी अजून मी चिटणीस मंडळात गेलो नाही, आणि तू तर चिटणीस मंडळात गेलीस, मध्यवर्ती मंडळात पण गेलीस. कारण चिटणीस मंडळात जाणे म्हणजे त्यावेळी शेतकरी कामगार पक्षामध्ये खूप मोठी बाब होती. दादांना त्याचा खूप आनंद झाला. मी देखील माझ्या परीने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांनी काढलेली शेतकऱ्यांची काळी दिंडी शेगाव ते नागपुर. त्या दरम्यान विदर्भामध्ये त्यांच्या बरोबर ज्या मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी प्रचाराच्या सभा घेतल्या. त्या प्रत्येक सभेत जाण्याची संधी मला त्यांच्यामुळे मिळाली. आणि विदर्भाचा नकाशा मला कळला. संपूर्ण विदर्भ काय आहे, तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, विदर्भातील व्यापारी कसे शेतकऱ्यांची लुटमार करत होते. हे प्रत्यक्ष त्यांच्या बरोबरीने मला पाहता आले.
आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आधारवड गेल्यासारखे वाटतेय. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे. पुरोगामी चळवळ डावी चळवळ त्यांच्या निधनाने आज पोरकी झाली.
(शब्दांकन भारत रांजणकर)