। पाली । वार्ताहर ।
पाली नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी मंगळवारी (ता.18) निवडणूक संपन्न झाली. अवघ्या चार जागांवर निवडणूक होत असल्याने दिवसभर मतदार मतदानासाठी येत होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पहायला मिळाली. तरीही दुपारी अडीच पर्यंत एकूण 57 टक्के मतदान झाले होते. चार जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चारही मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. काही मतदार आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले होते. मतदात्यांचा उत्साह चांगला होता.
मंगळवारी (ता.17) 2, 5, 8 व 14 या चार प्रभागांचा व 21 डिसेंबरला झालेल्या 13 प्रभागांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (ता.19) लागणार आहे. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील ही पहिलीच नगरपंचायत निवडणूक असल्याने ही नगरपंचायत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजप वेगवेगळे लढत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप यांनी आघाडी करून निवडणूक लढविली.







