प्रतिरोज 100 पेक्षा अधिकांचे तपासणी अहवाल सकारात्मक
लसीकरणामुळे दिलासा
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात कोरोनाचे संकट आजही कहर माजवित आहे. प्रतिरोज 100 पेक्षा अधिक नागरिकांचे कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तिसरी लाट सुरू आहे. दुसर्या लाटेच्या तुलनेत सध्या रुग्ण मिळत आहेत. सरासरी दिवसाला 200 रुग्ण मिळत आहेत. मात्र, यातील 95 टक्के पेक्षा जास्त रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. कारण त्यांना सौम्य लक्षणे आहेत. सौम्य लक्षणे असण्यामागे जिल्ह्यातील 97 टक्के नागरिकांनी घेतलेली पहिली लस हे कारण आहे.
2020 या कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी या पहिल्याच महिन्यात पूर्ण जगाला हादरवून सोडणार्या कोरोना व्हायरस या विषाणूने देशात शिरकाव केला. 26 मार्च 2020 रोजी मुंबईवरून जिल्ह्यात दाखल झालेल्या एका चाकरमान्याच्या रूपाने पहिला रुग्ण मिळाला. सलग 23 महिने आपण या जागतिक आपत्तीशी झुंज देत आहोत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. किती दिवस चालणार याची स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे अजून काय काय गमवावे लागणार ? याची भीती सतावत आहे. मात्र, या कोरोनाने जिल्ह्यातील आरोग्य सुविधेचे धिंडवडे काढले. मर्यादा स्पष्ट केल्या. आमचे शासन आरोग्य व शिक्षण याची जबाबदारी घेते, हे आम्ही अभिमानाने सांगत होतो. ते किती भंपक आहे, हे स्पष्ट झाले.
आता तिसरी लाट सुरू झाली आहे. ही तिसरी लाट पहिल्या व दुसर्या लाटेसारखी गंभीर परिणामकारक अद्याप दिसलेली नसली तरी कोरोनाबाधितांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा जास्त व दुसर्या लाटेत मिळणार्या बाधित संख्येच्या बरोबर आहे. या लाटेत कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे; पण गंभीर लक्षणे तुलनेने खूपच कमी दिसत आहेत. त्यामुळे त्याची दहशत अद्याप जाणवत नाही. परंतु दहशत नाहीच, असे म्हणता येणार नाही, कारण आजच्या घडीला सुद्धा सरासरी 60 च्या आसपास शासकीय संस्थेत रुग्ण उपचार घेत आहेत. 20 च्या आसपास ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरवर रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय जिल्ह्यात वैद्यकीय यंत्रणा अत्याधिक सुसज्य करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या ऑक्सिजनचे 6 प्लांट तयार असून, दोन तयार होत आहेत. जिल्हा रुग्णालयात दोन प्लांट सुरू असून, एक तयार होत आहे. शिवाय कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले येथे प्रत्येकी एक प्लांट आहे तर सावंतवाडी येथे दोन प्लांट तयार होत आहेत. 13 टन ऑक्सिजन निर्मिती जिल्ह्यात होत आहे. रिफलिंग प्लांट सुद्धा आहे. जीरा सिलिंडर सुद्धा उपलब्ध असून 1374 जंबो सिलिंडर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात 1380 बेड उपलब्ध करण्याचे आदेश असताना 1900 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 984 बेड असून त्यात 800 ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. तर कोविड केअर सेंटरमध्ये 917 बेड उपलब्ध आहेत.