खाडीच्या माशांना खवय्यांची मागणी; 500 ते 700 रुपये किलोचा भाव
| चिपळूण | प्रतिनिधी |
ताजा खाडीचा तांबोशी घ्या, जिवंत कोळंबी आहे, अशा हाका मारत सध्या दाभोळ आणि वाशिष्ठी खाडीतील माशांची विक्री सुरू आहे. 500 ते 700 रुपये किलोदराने माशांची किरकोळ विक्री केली जात आहे. बाजारात समुद्रातील मासळीची टंचाई निर्माण झाली असताना खाडीतील माशांना प्रचंड भाव आला आहे.
वाशिष्ठी आणि दाभोळ खाडीमध्ये सध्या विविध प्रकारची दर्जेदार मासळी मुबलक प्रमाणात मिळू लागली आहे. त्यामुळे मासळी बाजारात खाडीच्या माशांनी खवय्यांची मागणी पूर्ण केली असून, स्थानिक मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खाडीतील मासेमारी पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून असते. त्यामुळे मच्छीमारांची वेळ रोज बदलत राहते. मच्छीमार आपल्या छोट्या होडीने किंवा डबक्याने खाडीच्या अशा भागात जातात. काही मच्छीमार फाग (मोठे जाळे) टाकून चार ते पाच तास वाट पाहतात. काहीजण ओहोटीच्या वेळी चिखलात ‘वाघूर’ (विशेष जाळे) लावतात.
खाडीचे पाणी स्वच्छ झाल्यामुळे आता खाडीत रेणवी आणि तांबोशी यासारखे अत्यंत चवदार आणि महागडे मासे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी चक्क 2 ते 3 किलो वजनाचे मोठे मासे मच्छीमारांच्या जाळ्यात मिळत आहेत. समुद्रातील मासे उपलब्ध नसल्याने खवय्ये खाडीच्या माशांवर तुटून पडत आहेत. ग्राहकांकडून वाढलेल्या या मागणीमुळे खाडीच्या माशांना सध्या बाजारात 500 ते 700 रुपये प्रतिकिलो इतका विक्रमी दर मिळत आहे.
दाभोळ आणि वाशिष्ठी खाडीपरिसर पूर्वी लोटे परशुराम एमआयडीसीच्या रासायनिक सांडपाण्यामुळे त्रस्त होता. यामुळे स्थानिक मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला होता; मात्र, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी प्रदुषणाविरोधात दिलेल्या तीव्र संघर्षानंतर आता परिस्थिती सुधारली आहे. प्रदूषण नियंत्रण यंत्रणांवर आलेल्या दबावामुळे खाडीच्या पाण्याचा दर्जा सुधारला असून, घटलेले माशांचे प्रमाण आता पुन्हा वाढू लागले आहे. जेटीवर माशांचा लिलावजाळ्यात अडकलेले मासे काळजीपूर्वक बाहेर काढले जातात. होडीमध्येच रेणवी, तांबोशी, कोळंबी, खेकडे हे मासे वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये वेगळे केले जातात. कारण, वेगवेगळ्या माशांना बाजारात वेगळा भाव असतो. मासे पकडून मच्छीमार दाभोळ किंवा धोपावेसारख्या स्थानिक जेटीवर (किनाऱ्यावर) परत येतात. किनाऱ्यावर आधीच स्थानिक महिला आणि किरकोळ व्यापारी (मासेविक्रेते) वाट पाहत असतात. तिथे माशांचा लिलाव होतो.
दाभोळ खाडीत अधूनमधून रासायनिक पाणी येते त्यामुळे चिंता वाढते; मात्र काही दिवसांपासून स्थानिक जातीचे मासे चांगल्या प्रकारे मिळत आहेत त्यामुळे रोजची कमाईसुद्धा चांगली होत आहे.
गणेश कासेकर,
सोनगाव, खेड.







