। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एकदिवसीय संघाचे नेतृत्व गमावलेल्या विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेनंतर कसोटी कर्णधारपदही सोडून दिले. त्यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला ३-० अशा व्हाईट वॉशला सामोरे जावे लागले. दरम्यान, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मोठे वक्तव्य केले. रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहली कसोटीत कर्णधार म्हणून कायम राहिला असता. तो अजून दोन वर्षे तरी कसोटी संघाचा कर्णधार राहिला असता. कारण भारत पुढची दोन वर्षे मायदेशातच जास्त खेळणार आहे. या दरम्यान, विराट अजून ५० ते ६० कसोटी विजय आपल्या नावावर करू शकला असता. मात्र हे बऱ्याच लोकांना बघवत नव्हते.
लेजंड क्रिकेट लीगचे संचालक असलेले रवी शास्त्री सध्या या स्पर्धेसाठी मस्कत येथे आहेत. ते एका खासगी वृत्तवाहिनीसाठी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, विराट कोहलीचा राजीनामा प्रकरण आता इतिहास जमा झाले आहे. आपल्याला त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे. विदेशातील विराट कोहलीचे रेकॉर्ड हे अविश्वसनीयच आहे. भारताने त्यांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दित ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये विजय साजरा केला. आपण, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २-१ ने हरलो मात्र तरी देखील अजून विराट कोहलीने नेतृत्व केले पाहिजे की नाही यावर विचार करावा लागत आहे.