पारा 10 ते 12 सेल्सियस
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यात थंडीने परिसर गारठला असून भर दुपारी देखील बोचरी थंडीचा प्रभाव दिसून येत आहे. मुरूड-केळघर-रोहा मार्गावर म्हसाडी,गोपाळवट, पारगान,वाघिरपट्टी, नागशेत, गारम्बी या दुर्गम आणि जंगल भागात वसलेल्या गावच्या परिसरात शनिवार रविवार पासून थंडीचा तीव्र गारठा पडला असून थंडीचा पारा 10 ते 12 सेल्सियस असल्याची माहिती पारगान येथील रहिवासी तथा मुरूड तालुका धनगर समाज अध्यक्ष आणि रायगड जिल्हाउपाध्यक्ष धर्माजी हिरवे यांनी दिली. हिरवे कटुंबिय 1958 च्या आधीपासून पारगान येथे राहत असून अशी जीवघेणी थंडीचा गारठा प्रथमच अनुभवित असल्याचे यांनी सांगितले.
मुरूड पासून 11 किमी अंतरावर वसलेली ही 7 ते 8 गावे उंच डोंगरावर जंगल भागात वसलेली असून हा दुर्गम भाग समजला जातो.अचानक जीवघेणा प्रसंग निर्माण झाल्यास कोणतीही वैद्यकीय सोय येथे उपलब्ध नाही. अति गारठ्यामुळे हुडहुडी भरून हातपाय वाकडे होत असून गरम पाण्यात बुडवून ठेवावे लागत आहेत.आजारी किंवा वयस्कर मंडळींना गारठा सहन करण्यापलीकडे गेल्याचे हिरवे यांनी सांगितले.अति थंडीमुळे ताप, सर्दी, खोकला असे आजार बळावण्याची शक्यता हिरवे, यांनी व्यक्त केली आहे.