। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील सार्वजनिक व्यायामशाळेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सार्वजनिक व्यायामशाळेचे विश्वस्त श्रीकांत शिंदे, महेंद्र घासे, नगरसेवक अॅड गौतम पाटील, तसेच सिनेअभिनेते आणि व्यायामशाळेचे सदस्य देवदत्त नागे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पाटील यांनी व्यायामशाळेत मोठया संख्येने विद्यार्थी वाढत असल्याने व्यायामशाळेची जागा अपुरी पडत असून त्यादृष्टीने लवकरच नविन विस्तार करण्याचा मानस व्यक्त केला. त्याचप्रमाणे व्यायामशाळेत आणखी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करुन भविष्यात व्यायामशाळेचे नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संजय पाटील यांची निवड होताच अनेकांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.







