रेवदंडा | वार्ताहर |
पावसाने चांगली सुरूवात करून दिल्याने रेवदंडा व चौल परिसरातील पुष्करणी पाण्याने तुडूंब भरल्या आहेत. मात्र, परिसरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात रेवदंडा-चौल बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने पाण्याने तुडुंब भरलेल्या पुष्करणीत पोहण्याचा आनंद घेता येऊ शकत नसल्याने सर्वांचाच हिरमोड झाला आहे.
रेवदंडा व चौल ग्रामपंचायत हद्दीत रेवदंड हरेश्वर, चौल रामेश्वर तसेच चौल मुखरी गणपती येथील पुष्करणीवर ऐन पावसाच्या दिवसात पोहण्याचा आनंद लुटण्यास मोठी गर्दी असते. पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरलेल्या चौल रामेश्वर पुष्करणीत रोजची पोहण्यासाठी मोठी गर्दी असते. विशेषतः शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी तर पोहणार्यांची तुफान गर्दी पाहावयास मिळते. मात्र, पोहण्याचा आनंद न घेता येत असल्याने सर्वांचाच हिरमोड होत आहे. गतवर्षीसुद्धा कोरोना संसर्ग रोगाच्या कालावधीत चौल रामेश्वर पुष्करणीमध्ये पोहण्यास ग्रामपंचायतीने मनाई केली होती. यावर्षीसुद्धा पोहण्यास मिळणार नसल्याने पोहणार्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
चौल पुष्करणीमध्ये प्रतिवर्षी 15 ऑगस्ट रोजी रामेश्वर मित्रमंडळ चौल यांच्या वतीने पोहण्याच्या शर्यतीचे आयोजन केले जाते; परंतु गेल्यावर्षीसुद्धा या शर्यतीत सहभागी होण्याचा तसेच रसिक प्रेक्षकांना पोहण्याच्या शर्यती पाहण्याचा आनंद घेता आला नाही. यावर्षीसुद्धा 15 ऑगस्ट रोजी पोहण्याच्या शर्यती कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर होणार नाही, असेच चित्र दिसते. एकूणच, पोहण्याचा आनंद घेता येणार नसल्याने अनेकांच्या आनंदावर पाणी पडले असून, सर्वांचीच मनोमन नाराजी व्यक्त होते.